नवी दिल्ली । भारताने दीडशेपेक्षा जास्त चीनी अॅप्सवर बंदी घातल्यानंतर आता यातील काही अॅप्स हे दुसर्या नावाने गुगल प्ले स्टोअरवर दिसू लागल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हिंदुस्थान-चीन सीमेवरील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दीडशेपेक्षा जास्त चिनी स्मार्टफोन अॅप्लीकेशन्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. आता यातील बरेचसे अॅप्स नव्या रूपात युजर्सपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न चिनी कंपन्यांनी सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांत प्ले स्टोअरवर नवीन नावाने हे अॅप्स अवतीर्ण झाले असून कोटयवधी लोकांनी ती डाऊनलोड केल्याची धक्कादायक माहिती एका अहवालातून पुढे आली आहे.
केंद्र सरकारने सुरुवातीला टिकटॉकसहित ५९ अॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर जुलै महिन्यात ४७ आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ११८ चायनीज अॅप्सवर बंदी घातली आहे. हेच अॅप्स आता नाव आणि डिझाईनमध्ये बदल करून प्ले स्टोअरच्या माध्यमातून पुन्हा सादर आणण्यात आली आहेत. यात स्नॅक व्हिडीओ या अॅपमध्ये टिकटॉकचे बहुतांश फिचर्स आहेत. तर हॅगो या बंदी घातलेल्या अॅपच्या जागी आता ओला पार्टी नावाचे ऍप आले आहे. यामुळे युजर्सच्या माहितीच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे