जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील कालींका माता मंदिर परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेत भर दिवसा दरोडा टाकून रोकड लांबविल्याची धक्कादायक घटना आज घडल्याने खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील प्राथमिक माहिती अशी की, कालींका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. आज सकाळी नऊ वाजता बँक उघडून नियमीतपणे कारभार सुरू झाल्यानंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन युवक दुचाकीवरून बँकेत आले. त्यांच्याकडे कोयत्यासारखे धारदार शस्त्र होते. या शस्त्राच्या बळावर त्यांनी व्यवस्थापकासह पाच-सहा कर्मचार्यांना धमकावले. याप्रसंगी त्यांनी व्यवस्थापकाच्या मांडीवर कोयत्याने वार देखील केले. यानंतर त्यांनी बँकेतील रोकडे लांबवून पलायन केले.
अवघ्या काही मिनिटांमध्ये चोरट्यांनी लुट करून पलायन केले. त्यांनी बँकेतील अंदाजे १५ लाखांपेक्षा रूपयांची रोकड लांबविल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बँकेत धाव घेतली. जखमी झालेल्या व्यवस्थापकांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी एसपी एम. राजकुमार, अपय अधिक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीचीचे प्रभारी शंकर शेळके आदींनी सहकार्यांसह भेट दिली असून श्वास पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. तर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
( ही बातमी आताच ब्रेक झाली असून आम्ही याचे अपडेट आपल्याला लागलीच देत आहोत. )