मुंबई-वृत्तसेवा । टी-२० क्रिकेट विश्वचषक २०२६ संदर्भात मोठी घडामोड समोर आली आहे. बांगलादेश क्रिकेट संघाने भारतात येऊन टी-२० विश्वचषक खेळण्यास स्पष्ट नकार दिला असून, त्यामुळे बांगलादेशचा या स्पर्धेतील सहभागच संशयात आला आहे. आयसीसीने ठिकाण बदलण्यास नकार दिल्यानंतर बांगलादेशने हा कठोर निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

२०२६ चा टी-२० विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत खेळवण्यात येणार आहे. मात्र, बांगलादेश संघ भारतात सामने खेळण्यास सुरुवातीपासूनच अनिच्छुक होता. अखेर आयसीसीने वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचे ठामपणे सांगितल्यानंतर बांगलादेशने भारतात न खेळण्याचा निर्णय घेतला.

या वादामागे आयपीएल २०२६ मधील बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याचा मुद्दा असल्याचे सांगितले जात आहे. मोठ्या वादानंतर बीसीसीआयने कोलकाता नाइट रायडर्स (KKR) फ्रँचायझीला मुस्तफिजूरला संघातून वगळण्याचे निर्देश दिले. त्यानंतर केकेआरने त्याला रिलीज केले.
या निर्णयामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्ड प्रचंड नाराज झाला. त्यानंतरच बांगलादेशने भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले.
दरम्यान, २१ जानेवारी रोजी आयसीसीने बांगलादेशला स्पष्ट इशारा देत सांगितले होते की, ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारतात सामने खेळावेत, अन्यथा स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल. अखेर बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार देत टी-२० विश्वचषकातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.



