सावदा, ता. रावेर-जितेंद्र कुलकर्णी (एक्सक्लुझीव्ह रिपोर्ट ) | रेल्वेच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात शेतकरी आणि व्यापार्यांनी आवाज उठवून देखील याचा काहीही परिणाम झाला नसल्याने परिसरातील शेतकर्यांना तब्बल सुमारे १५ लाख रूपयांचा फटका बसल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, सावदा येथील रेल्वे स्थानकावरून केळी फळबागायतदार युनियनच्या माध्यमातून रेल्वे डब्यांमधून केळी ही उत्तर भारतात जात असते. यात प्रामुख्याने आझादपूर मंडी ही केळीची मोठी बाजारपेठ आहे. येथे दररोज सकाळी केळ्यांचे व्यापारी मोठ्या संख्येने येतात. आणि ते खान्देशातील रेल्वेतून आलेल्या केळीला ऑन द स्पॉट खरेदी करतात. मात्र अनेकदा रेल्वे गाडी विलंबाने पोहचत असल्याने मोठे नुकसान होते. काही दिवसांपूर्वी असलाच प्रकार घडल्याने खासदार रक्षाताई खडसे यांनी शेतकरी आणि व्यापार्यांना सोबत घेऊन डीआरएम यांच्याशी चर्चा केली होती. त्याप्रसंगी भविष्यात असा प्रकार घडणार नसल्याचे सांगण्यात आले होते.
यानंतर काही दिवस ही केळीची वाहतूक सुरळीत चालली. मात्र आता एक संपूर्ण ट्रेनमधील केळी फेकून देण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. दिनांक २६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता सावदा रेल्वे स्थानकावरून ४२ डब्यांची मालगाडी निघाली. या सर्व डब्यांमध्ये केळी भरलेली होती. ही गाडी नियमीत स्पीडने गेली. मात्र आग्र्यानंतर ही काळी इतकी संथपणे पुढे सरकली, की आझादपूर मंडी येथे ही गाडी तब्बल ४८ तासांनी म्हणजे २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता पोहचली.
आझादपूर मंडी येथील व्यापारी हे सकाळी सहा वाजेपासून तेथे आलेले असतात. ते सकाळी दहा आणि अगदी थोडा विलंब झाला तर बारा वाजेपर्यंत थांबतात. मात्र ते नंतर आलेला माल घेत नाहीत. यामुळे त्यांना ४८ तासांनी आलेला माल घेतला नाही. यानंतर यातील बरीचशी केळी पिकून गेली. तर काही खराब झाली. यामुळे केळीचा संपूर्ण रॅक हा पूर्णपणे फेकून द्यावा लागणार आहे. यामुळे सावदा परिसरातील शेतकरी आणि व्यापार्यांचे सुमारे १५ लाख रूपयांचे नुकसान होणार आहे.
केळी हे नाशवंत फळ असल्यामुळे याच्या वाहतुकीला प्राधान्य देऊन याची गाडी लवकरात लवकर इच्छीत स्थळी पोहचावी अशी मागणी परिसरातील केळी उत्पादकांकडून करण्यात येत आहे. भुसावळ येथील रेल्वेच्या अधिकार्यांचे आता सहकार्य मिळत असले तरी संथ गतीच्या गाडीमुळे शेतकर्यांना फटका पडल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.