Home Agri Trends मी आणि माझे संशोधन : भाग ९ – प्रश्नावली आणि मुलाखती

मी आणि माझे संशोधन : भाग ९ – प्रश्नावली आणि मुलाखती


ख्यातनाम ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या अंतर्गत ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ : जळगाव जिल्हा) या विषयावर शोध प्रबंध सादर केला आहे. यातील सारांशाचा वाचा हा नववा भाग.

संशोधन कार्य पूर्ण करीत असताना निश्चित केलेल्या विषयाच्या संदर्भात संबंधित घटक – व्यक्ती – क्षेत्र – कालावधी निश्चित करून त्यानुसार माहिती संकलन करणे आवश्यक असते. संशोधन कार्यासाठी निश्चित केलेला विषय ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ : जळगाव जिल्हा)’ हा होता. त्यामुळे या विषयाशी संबंधित प्रामुख्याने तीन घटक होते. पहिला घटक केळी लागवडसाठी नवतंत्र वापरणारा हवा, दुसरा घटक बहुमाध्यमात केळी लागवड नवतंत्राची माहिती प्रसिद्ध करणारा संपादक – पत्रकार हवा आणि तिसरा घटक कृषी नवतंत्र संशोधनाची माहिती असलेला तज्ज्ञ – अभ्यासकांचा हवा होता.

प्रश्नावलीचे पहिले पान

केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्याने केळी लागवडचे नवतंत्र शेतात वापरून केळी लागवडीचे उत्पादन – उत्पन्न वाढविलेले हवे, तो बहुमाध्यमांमधील केळी लागवड नवतंत्राची माहिती वाचून – पाहून तीचा वापर करणारा हवा, हातात जादा उत्पन्न आल्यानंतर केळी उत्पादकाने स्वतःच्या राहणीमानात व जीवनशैलीत बदल केल्याचे दिसायला हवे हे सांख्यिकी आकडेवारीतून आवश्यक होते. बहुमाध्यमात वृत्तपत्रे, मासिके यासह इंटरनेटवरील पोर्टल, युट्यूब चॅनेल, सोशल मीडिया यातही केळीविषयक आशयाचे प्रसारण हवे होते, केळीचे उत्पादन वाढल्याविषयी खात्रीशीर माहिती हवी होती. शिवाय उत्पन्न वाढीतून शेतकऱ्यांनी स्वतःच्या राहणीमानात केलेला बदल हा दृश्यात्मक व आर्थिकस्तर वाढलेला दर्शविणारा हवा होता. या सर्व बाबी निश्चित करूनच प्रश्नावली भरून घेणे आणि मुलाखतींचे नियोजन करणे निश्चित केले.

जेआयएसलमधील नवतंत्राची पाहणी करताना संशोधक

नवतंत्र वापरून केळी लागवड करणारा शेतकरी हा घटक निश्चित होता. त्याचे कार्यक्षेत्र जळगाव जिल्ह्यातील १५ तालुके होते. तालुके निवडताना ज्या तालुक्यांमध्ये केळीे क्षेत्र जास्त आहे त्यांंच्याकडे लक्ष दिले. मुलाखतीसाठी नवतंत्र वापरणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या तालुकानिहाय एकत्रित ५०० निश्चित केलेली होती. मुलाखतीसाठी ३० केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या निश्तिच होती. मुलाखतीसाठी बहुमाध्यमांच्या संपादकांची संख्या १० निश्चित होती. याशिवाय केळी उत्पादन नवतंत्र व लागवड संदर्भात १० तज्ज्ञांच्या मुलाखती घेण्याचे ठरविले होते. मुलाखतीसाठी जवळपास सर्व मिळून ५५० घटकांची संख्या निश्चित केलेली होती. रावेर, यावल, जामनेर, मुक्ताईनगर, चाळीसगाव, भडगाव या तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या लक्षणिय घेतली होती.

प्रश्नावली भरून देणारे शेतकरी

केळीचे नवतंत्र वापरणारे शेतकरी निश्चित करताना कृषी नवतंत्र निर्मितीत अग्रेसर असलेल्या ‘जेआयएसएल’ सोबत नेटाफिम, एफआयएल, ईपीसी, श्रीराम प्लास्ट आणि कोठारी या पाच कंपन्यांचा विचार केलेला होता. मात्र यात निम्मे म्हणजे २५० केळी उत्पादक शेतकरी हे ‘जेआयएसएल’ शी संबंधित व २५० शेतकरी हे इतर कंपन्यांशी संबंधित होते. ‘जेआयएसएल’ कडे सर्व प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, जळगाव जिल्ह्यातील केळी लागवड करणाऱ्या ६५ टक्के शेतकऱ्यांकडे ‘जेआयएसएल’ चे नवतंत्र वापरात आहे याचा विचार केलेला होता. शिवाय ‘जेआयएसएल’ ने तालुकानिहाय क्षेत्रिय संघटकांची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची गेल्या पाच – सात वर्षांतील माहिती उपलब्ध होती. केळी लागवड करणाऱ्यांच्या राहणीमानातील बदल हा त्यांच्या नियमित भेटींच्या कार्याचा भाग होता.

प्रश्नावली भरून देणारे शेतकरी

प्रश्नावलीचे स्वरूप ठरवताना ती योग्य पर्याय निवड सूचविणारी आणि काही प्रश्नांच्या बाबतीत सविस्तर उत्तर लेखनास भाग पाडणारी होती. चार पानांच्या प्रश्नावलीत एकूण तीन प्रकारात ६० प्रश्न होते. त्यात ‘अ’ प्रकारात शेतकऱ्यांच्या व्यक्तीगत माहितीचे १३, इतर माहितीचे ७, ‘ब’ प्रकारात ‘जेआयएसएल’च्या नवतंत्र वापराशी संबंधित २०, इतर ४, ‘क’ प्रकारात व्यक्तीगत १६ आणि इतर ६ प्रश्न होते.

हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन भाग १ : शिक्षण आणि नोकरीशी संबंधित अनुभवांचा प्रवास !

बहुतांश केळी उत्पादक शेतकरी ‘जेआयएसएल’चे नवतंत्र वापरतात हे लक्षात घेऊन प्रत्यक्ष ठिबक सिंचन पद्धती किती शेतकरी वापरतात हे प्रश्नावलीच्या उत्तरातून समजून घेतले तेव्हा लक्षात आले, ‘जेआयएसएल’ चे ठिबक संच वापरणारे ६५ टक्के शेतकरी आहेत. इतर कंपन्यांसाठी हीच टक्केवारी कमीत कमी ३ आणि जास्तीत जास्त १० होती. प्रश्नावली भरून घेण्याचा कालावधी दोन महिन्यांचा निश्चित केलेला होता. या कामासाठी संशोधकाला ‘जेआयएसएल’ च्या तालुकािनहाय क्षेत्रिय संघटकांनी सहकार्य केले.

हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग २ – पीएच. डी. प्रवेशातील रंजकता

केळी उत्पादकांच्या वयोगटाची विभागणी ४ प्रकारात केली होती. २५० पैकी २० ते ३९ वर्षे वयोगटात २३ टक्के, ४० ते ४९ वर्षे वयोगटात ३९ टक्के शेतकरी होते. ५० वर्षे वयोगटात २५ टक्के आणि ६० वर्षांच्यावर वयोगटात असू शेती करणारे अवघे ६ जण म्हणजे ८ टक्के होते. केळी उत्पादकांचे शिक्षण माहिती करून घेताना केवळ २.८ टक्के म्हणजे १४ शेतकरी अशिक्षित असल्याचे आढळले. मात्र पदवीधर व पदव्युत्तर शेतकऱ्यांची संख्या जवळपास २०० वर होती. केळी उत्पादकांकडे शेती किती प्रमाणात (एकरमध्ये) आहे? हे सुद्धा जाणून घेतले.

हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ३ – संशोधन कार्याचा वेगाने प्रारंभ !

केळी उत्पादकांमध्ये शेती करण्याचे तीन प्रकार दिसले. पहिला स्वतःची शेती करण्याचा. दुसरा भाडोत्री शेती करण्याचा. तिसरा स्वतःची आणि भाडोत्री शेती करण्याचा. ५०० शेतकऱ्यांमध्ये २ शेतकरी असे होते, ज्यांच्याकडे स्वतःची १ गुंठाही शेतजमीन (म्हणजे १ हजार चौरस फूट) नव्हती. तरीही ते शेतकरी १०० एकरवर भाडोत्री शेती करीत असल्याचे दिसले. ४० एकरपर्यंत शेती करणारे ४६ टक्के होते. १०० एकरवर शेती करणारे ५ टक्के होते. यापैकी ८६ टक्के शेतकरी म्हणाले, आम्ही शेती करण्यात समाधानी आहोत. केवळ ५ टक्के शेतकऱ्यांनी शेती करणे परवडत नाही असे म्हटले. २३ टक्के शेतकरी शेती करण्यात समाधानी दिसले.

हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ४ – संशोधन म्हणजे काय ?

केळी लागवडीसाठी नवतंत्र वापरणारे ५०० पैकी बहुतांश शेतकरी आढळले. उती संवर्धित रोपे वापरणारे व ठिबक सिंचन संच वापरणारे ४९० होते. केळी लागवडीनंतर द्रवरुप खते – पोषके देणारे ३१०, मल्चिंग पेपरचा वापर करणारे ८४ शेतकरी होते. केळी लागवडीसाठी स्वयंचलित नवतंत्र वापरणारे अवघे ४ शेतकरी होते. यातही ‘जेआयएसएल’च्या ऊती संवर्धित रोपांचा व ठिबक सिंचन संचाचा वापर करणारे १०० टक्के म्हणजे २५० शेतकरी होते. ‘जेआयएसएल’चे फर्टीगेश नवतंत्र वापरणारे २००, मल्चिंग पद्धत वापरणारे ८० शेतकरी होते.

हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ५ – संशोधन पद्धती निश्चित करणे !

केळी लागवडीसाठी वतंत्र वापरल्यामुळे केळीचे उत्पादन किती वाढले याचीही आकडेवारी शेतकऱ्यांना विचारली. पारंपारिक पद्धतीने खोडवा रोपण केले तर १०० पैकी किती रोपे जगतात हे विचारल्यावर ७५ रोपे जगतात हे समोर आले. पारंपारिक पद्धतीत जमिनीवरून प्रवाह स्वरुपात पाणी सोडल्यास केवळ ५० टक्के वापर होतो हे दिसून आले. शिवाय पारंपारिक पद्धतीने केळीचे उत्पादन ८० टक्केच मिळते असे सांगण्यात आले.

हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ६- बहुमाध्यमांच्या प्रभावाचा अभ्यास

मात्र नवतंत्र वापराच्या पद्धतीत उती संवर्धित १०० टक्के रोपे उगवतात, ठिबक सिंचनामुळे पाण्याचा १०० टक्के वापर होतो आणि केळी उत्पादनात १२० टक्के (सर्व झाडांवर घड आणि केळी वजनात वाढ) होते असे दिसून आले. पारंपरिक पद्धतीने केळी घडाचे जास्तीत जास्त वजन १६ ते १८ किलो जाते मात्र नवतंत्र वापरामुळे केळी घडाचे वजन ३० ते ४० किलोपर्यंत जाते असे शेतकरी म्हणाले. उत्पादन वाढीचा हा निष्कर्ष ‘जेआयएसएल’ व इतर कंपन्यांच्या नवतंत्र वापराला पूरक ठरणारा आहे. नवतंत्र वापरामुळे केळीचे उत्पादन व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते या तथ्याला यामुळे बळकटी मिळाली.

हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ७ – शेतीचे नवतंत्रज्ञान आणि वापर

कृषी नवतंत्राची माहिती मिळविण्यासाठी बहुमाध्यमांच्या वापरासंबंधीत प्रश्नांना शेतकऱ्यांनी उत्स्फुर्तपणे उत्तरे दिली. पारंपारिक माध्यमे वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाल्याचे लक्षात आले. ५०० शेतकऱ्यांमध्ये वृत्तपत्र वाचणारे ३७५, टीव्ही पाहणारे १०७ आणि रेडिओ ऐकणारे १०४ शेतकरी दिसले. इंटरनेट आधारित बहुमाध्यमांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १०० टक्के होती. कारण सर्वच शेतकऱ्यांकडे महागातले किंवा स्वस्तातले स्मार्ट मोबाईल होते.

यातील ९४ टक्के शेतकरी मोबाईलवर विविध प्रकारचे मोबाईल अॅप वापरून शेतीच्या नवतंत्राची माहिती घेतात असे दिसले. यात व्हाट्स अॅप वापरणारे ८३ टक्के, फेसबूक वापरणारे ७५ टक्के, यूट्युबचा वापर करणारे ५२ टक्के, इन्स्टाग्राम वापरणारे २२ टक्के आढळले. बहुमाध्यमांचा अशा प्रकारे वापर हा पारंपारिक माध्यमांपेक्षा किती तरी टक्के जास्त आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी बहुमाध्यमे वापरून केळी उत्पादनाविषयी माहिती मिळवतो, तीचा वापर कृतीत करतो या तथ्याला बळकटी मिळाली. केळी उत्पादक शेतकरी बहुमाध्यमातून पूरक हवामान, गुणवत्तेची रोपे, योग्य लागवड पद्धती, सिंचन पद्धती, मशागत तंत्र, फळवाढ संबंधित माहिती व बाजारपेठेची माहिती घेतात हे सुद्धा लक्षात आले.

हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ८ – ‘जेआयएसएल’ आणि कृषी नवतंत्रज्ञान

केळी उत्पादकांचा नवतंत्र वापर आणि माहिती मिळविण्यासाठी बहुमाध्यम वापर ही दोन तथ्ये सांख्यिकी माहितीतून सिद्ध होत असल्यानंतर केळी उत्पदकांच्या राहणीमानातील बदलाचे अनेक निष्कर्ष सिद्ध होत असल्याचे समोर आले. शेतकऱ्यांच्या राहणीमानातील बदलांची माहिती घेताना वाहन खरेदी, उपकरणे खरेदी, घरांचे बांधकाम, मालमत्ता खरेदी, जुने घर दुरुस्ती, शेती वाढविणे, देवदर्शन – पर्यटन करणे, विदेश दौरा करणे, पाल्यांचे शिक्षण आणि हौस – मौजेवर खर्च या प्रश्नांनाही शेतकऱ्यांनी सकारात्मक उत्तरे दिली. शेतकऱ्यांचे राहणीमान बदलते आहे, हेच चित्र सांख्यिकी आकडेवारीतून समोर आले.

याबरोबरच केळी उत्पादकांची समाजात पत – प्रतिष्ठा वाढत असून त्याला विविध मान – सन्मान – पदे मिळत असल्याचे आढळून आले. अशाच प्रकारचे निष्कर्ष हे ३० केळी उत्पादकांच्या प्रदीर्घ मुलाखतीतून समोर आले. आकडेवारी संदर्भात सविस्तर स्पष्टीकरण शोधप्रबंधात दिलेले आहे.

दैनिके – मासिके – न्यूज पोर्टलच्या संपादक व पत्रकारांनी बहुमाध्यमातील आशयाची उपयुक्तता मान्य केली. दैनिकांमधून कृषी मजकूर वा कृषी विषयक पुरवण्याची पाने – जागा कमी झाल्याचे मान्य केले. त्याचवेळी इंटरनेट आधारित बहुमाध्यमांमधून २४ तास गुणिले सात दिवस कृषी विषयक नवतंत्र शेतकऱ्यांना उपलब्ध असल्याचे मान्य करीत बहुमाध्यमे केळी उत्पादकांचे राहणीमान बदलासाठी पूरक ठरत असल्याचा समान निष्कर्ष समोर आणला.

गेल्या तीस वर्षांत खान्देशात आणि महाराष्ट्रासह भारतात ‘जेआयएसएल’ ने केळी लागवडीचा पूर्ण पॅटर्न बदलू टाकला हे सत्य प्रश्नावली व मुलाखतींमधील माहिती संकलनातून समोर आले.

( अंतिम भाग – निष्कर्ष आणि सूचना )

संशोधकाचा केळी लागवडीवर प्रसिद्ध लेख

Protected Content

Play sound