ख्यातनाम ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या अंतर्गत ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ : जळगाव जिल्हा) या विषयावर शोध प्रबंध सादर केला आहे. यातील सारांशाचा वाचा हा आठवा भाग.
संशोधन कार्यासाठी निश्चित केलेला विषय ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन ( विशेष संदर्भ : जळगाव जिल्हा )’ याचा थेट संबंध जळगाव येथील जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेड अर्थात ‘जेआयएसएल’ शी आहे. गेल्या ४० वर्षांपासून म्हणजे १९८६ पासून ‘जेआयएसएल’ कृषीशी संबंधित विविध तंत्रज्ञान निर्मिती आणि प्रचार – प्रसारासाठी प्रयत्न करीत आहे.


कृषीच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञान संशोधन, त्याची उपयुक्तता तपासून त्या तंत्रज्ञानाची निर्मिती, शेतकऱ्यांच्या शेत शिवारापर्यंत त्या तंत्रज्ञानाचा प्रचार – प्रसार आणि गरजेनुसार नवतंंत्र वापराची शेतात स्थापना करण्याचे कार्य ‘जेआयएसएल’ करीत आहे. संशोधन कार्य पुढे नेताना कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक विषय ‘जेआयएसएल’ मधील प्रयोग – कार्यशाळा येथे जाऊन माहित करून घेता आले. केळी लागवड, त्याच्याशी संबंधित नवतंत्र, केळीचे वाढीव उत्पादन – उत्पन्न याविषयी अधिकाधिक माहिती ‘जेआयएसएल’ मधून मिळणे शक्य झाले. गाईड प्रा. डाॅ. सुधीर भटकर यांच्या सूचनेनुसार संशोधन प्रबंधात ‘जेआयएसएल’ च्या कार्याविषयी स्वतंत्र प्रकरण समाविष्ट केले आहे.

जळगाव येथील श्रद्धेय भवरलालजी हिरालालजी जैन यांनी भारतीय प्रशासनिक सेवेतील नोकरी नाकारून १९६३ मध्ये सर्व प्रथम राॅकेल – पेट्रोल – डिझेल विक्री व्यवसायात पाऊल ठेवले. यासाठी ‘जैन ब्रदर्स’ नावाने फर्मचा प्रारंभ केला. याच फर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या सेवा – साहित्याचा पुरवठा करण्यास प्रारंभ केला. १९७५ ते १९८७ मध्ये बियाणे, खते, पोषके, किटनाशके पुरवठा करण्यास प्रारंभ केला. शेतीसाठी उपयुक्त ठरणारे ट्रॅक्टर व इतर तांत्रिक उपकरणे विक्री सुरु केली. जैन ब्रदर्सकडे तेव्हा ८० वर सेवा – उत्पादन विक्रीची सुविधा उपलब्ध होती.

भवरलालजी जैन स्वतः वाकोद (ता. जामनेर) येथील कुटुंबाच्या मालकीच्या शेतात विविध तांत्रिक प्रयोग करीत असत. १९७८ मध्ये भवरलालजींनी तोट्यात गेलेल्या केळी पावडर निर्मिती प्रकल्पाची जळगाव येथील ( निमखेडी रस्त्यावर )जागा खरेदी करून तेथे पपईच्या चिकापासून पपेन निर्मितीचा कारखाना सुरु केला. त्यांनी निर्मिती केलेले पपेन हे टाटा एक्सपोर्टच्या माध्यमातून थेट विदेशात निर्यात होत असे. २००२ पर्यंत पपेन निर्मिती सुरु होती. तेव्हा जैन ब्रदर्सचा विविध सेवा – विक्री व्यवसायात व्याप वाढतच होता.

१९७२ – १९७३ मध्ये देशावर दुष्काळाचे सावट होते. जेवढे पाणी सिंचनासाठी उपलब्ध आहे ते पिकांपर्यंत पुरेशा प्रमाणात वाहून नेण्यासाठी पीव्हीसी पाईपची विक्री तेव्हा वाढलेली होती. सरकारचे धोरणही पीव्हीसी पाईप वापरासाठी पूरक होते. १९७५ मध्ये जैन ब्रदर्सने पीव्हीसी पाईपची विक्री सुरु केली. मात्र शेतकऱ्यांकडून सिंचनासाठी पाईपची मागणी जास्त होती आणि कंपनीकडून पुरवठा कमी होता. त्यामुळे भवरलालजींनी १९८० मध्ये स्वतः ‘जैन पाईप’ ची स्थापना करून पाव्हीसी पाईप निर्मितीचा प्रकल्प पपेनच्या जागेवर सुरु केला.
हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन भाग १ : शिक्षण आणि नोकरीशी संबंधित अनुभवांचा प्रवास !
अवघ्या दोन वर्षांत म्हणजे १९८२ नंतर ‘जेआयएसएल’ पीव्हीसी पाईप निर्मितीत भरारी घेऊ लागली. या दरम्यान भवरलालजींनी कॅलिफोर्नियातील एका प्रदर्शनात ठिबक सिंचन संच पहिले. भारतात कृषी क्षेत्रात ठिबक सिंचन प्रणाली वापरणे गरजेचे आहे हे त्यांनी लक्षात घेतले. १९८७ मध्ये त्यांनी ‘जैन ड्रिप’चेे उत्पादन सुरु केले. याच दरम्यान ‘जेआयएसएल’ ची स्थापना करण्यात आली. १९८८ नंतर जैन ठिबक सिंचन पद्धतीचा झपाट्याने प्रचार – प्रसार व वापर सुरु झाला. १९८९ मध्ये जैन संशोधन आणि विकास केंद्राची स्थापना भवरलालजींनी केली. याच संस्थेच्या माध्यमातून कृषी नवतंत्र संशोधनाचे अखंड – अविरत कार्य सुरु झाले. १९९१ नंतर ‘जेआयएसएल’ ने विविध नवतंत्र निर्मिती क्षेत्रात दमदारपणे पाऊल टाकले.
हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग २ – पीएच. डी. प्रवेशातील रंजकता
१९९४ भवरलालजींनी ऊती संवर्धित रोप निर्मिती क्षेत्रात पाऊट टाकले. त्यांनी याच वर्षी केळीच्या जी नाईन (ग्रॅण्ड नाईन) प्रकारातील ऊती संवर्धित रोपे आयात करून ती महाराष्ट्र व गुजरातमधील शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिली. खोडवा अशा पारंपारिक पद्धतीने केळीची लागवड करण्याच्या पद्धतीत ऊती संवर्धित रोपांची लागवड हे क्रांतीकारी पाऊल ठरले. त्यानंतर भवरलालजींनी स्वतःच्या संशोधन केंद्रात ऊती संवर्धित रोपांची निर्मिती सुरु केली. आज २०२५ मध्ये ‘जेआयएसएल’ ची भारतातील सर्वांत मोठी ऊती संवर्धित रोप निर्मितीची ‘फॅक्टरी’ आहे. तेथे विविध फळे – पिके यांची ऊती संवर्धित रोपे तयार होतात.
हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ३ – संशोधन कार्याचा वेगाने प्रारंभ !
‘जेआयएसएल’ मध्ये १९९६ दरम्यान जैन तुषार सिंचन पद्धतीच्या यंत्रणेची निर्मिती सुरु झाली. याबरोबरच ‘जेआयएसएल’ ने ठिबक, तुषार, गाळणी (फिल्टरेशन), पाईप, सौर ऊर्जा, प्लास्टिक शीट, सांडपाणी व्यवस्थापन याच्याशी संबंधित विविध उत्पादनांच्या क्षेत्रात यशस्वीपणे पाऊल ठेवले. ‘जेआयएसएल’ मुळे महाराष्ट्रासह भारतातील कृषी संशोधन क्षेत्रात झपाट्याने क्रांती होत नव – नवे तंत्र शोधले जाऊन ते शेतात वापरले जावू लागले.
हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ४ – संशोधन म्हणजे काय ?
कृषी क्षेत्रात पिकांसाठी लागवड – पेरणी पासून, रोगांपासून संरक्षण ते प्रक्रियापर्यंतची साखळी ‘जेआयएसएल’ ने निर्माण केली. जैन टिश्यू कल्चर, जैन हायटेक नर्सरी, जैन ग्रीन हाऊस या क्षेत्रात काम करीत स्त्रोत ते मूळापर्यंत (Resource to Root) अशी संकल्पना कृतीत आणली. ‘जेआयएसएल’ च्या कृषी नवतंत्रज्ञानाचा लाभ भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांनी गेल्या चार दशकांमध्ये घेतला आहे.
हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ५ – संशोधन पद्धती निश्चित करणे !
केळी लागवड संदर्भात ‘जेआयएसएल’ ने १९९५ ते २०२३ दरम्यान केलेल्या कार्याची स्वतंत्रपणे दखल संशोधन प्रबंधात घेतली आहे. भारतात केळीचे उत्पादन प्रती हेक्टर २५ – २७ टनपासून ३८ – ४० – ४५ टनांपर्यंत नेण्यात ‘जेआयएसएल’ च्या नवतंत्र निर्मिती – प्रचार – प्रसाराचा मोठा सहभाग आहे. केळी लागवड पद्धतीत मूलतः बदल ‘जेआयएसएल’ ने केले. केळीची सपाट जागेवर चारी पद्धतीने होणारी लागवड बंद करून गादी वाफा पद्धतीने लागवड सुरु केली. खोडवा वापर बंद करू ऊती संवर्धित रोपे आणली. केळी लागवडीच्या जमिनीत पूरक घटक वाढविण्यासाठी खतांचे पर्याय दिले. केळीच्या सिंचनासाठी ठिबकचा वापर वाढविला. केळी लागवड प्लास्टीक कागदाचे आवरण वापरून सुरु केली. ठिबक सिंचन प्रकारातून द्रवरूप खते व पोषके देण्याची पद्धत विकसित केली. केळीच्या खोडांची वाढ सुरक्षित करण्यासाठी तंत्र विकसित केले. केळी घडांच्या वाढीकडे लक्ष दिले. केळीचा आकार व वजन वाढावे म्हणून केळी घडांची संख्या नऊ – आठवर आणली. केळी घडांच्या संरक्षणासाठी आवरण आणले.
हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ६- बहुमाध्यमांच्या प्रभावाचा अभ्यास
केळीचे फूल व शेवटचे तंत्तू गुच्छ काढण्याविषयी शेतकऱ्यांमध्ये जागृती आणली. केळी काढणीच्या वेळी फळ स्वच्छ करून पॅकिंग करण्याचे तंत्र विकसित केले. केळी वाहतुकीसाठी तापमान नियंत्रित वाहने, गोदामे याची साखळी निर्माण करण्याचे प्रयत्न केले. केळीवर प्रक्रिया प्रकारात स्वतः पाऊल ठेवले. केळी निर्यातीचा व्यवहार वाढावा म्हणून शेतकरी – सरकार आणि खासगी विक्री संस्थाकडे प्रयत्न केले. केळी लागवडीच्या नवतंत्र संशोधन संदर्भात ‘जेआयएसएल’ बहुमाध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे प्रकाशन करीत असते. याचा तपशील संशोधन प्रबंधात आहे.
हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ७ – शेतीचे नवतंत्रज्ञान आणि वापर
‘जेआयएसएल’ मुळे भरतातील केळी लागवडीच्या पद्धतीत अमुलाग्र बदल झाला. ‘जेआयएसएल’ च्या केळी संशोधन कार्यात तेथील कृषी संशोधक डाॅ. के. बी. पाटील यांच्या ३० वर्षांच्या अनुभव व कार्याचे मोठे योगदान आहे. केळीला ‘जळगावची केळी’ हे भौगोलिक मानांकन ‘जी आय’ मिळवून देण्यात ‘जेआयएसएल’ चे मोठे योगदान आहे. ‘जेआयएसएल’ मुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय बदल झाला ? याविषयी एक शोध अहवाल ‘टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स’ ने २०११ मध्ये तयार केला होता. त्याचा विषय ‘जैन सिंचन प्रणालीद्वारे शाश्वत कृषी विकास’ हा होता. या अहवालासाठी जिल्ह्यातील जवळपास ५ हजार शेतकऱ्यांच्या कृषी पद्धती व राहणीमानाचे वेगवेगळ्या चौकटीत सांख्यिकी सर्वेक्षण करण्यात आले होते. सर्वेक्षणाचा अंतिम निष्कर्ष हा शेतकऱ्यांचे कृषी उत्पादन – उत्पन्न वाढून राहणीमान बदलत आहे हाच आला होता.
यानंतर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या राहणीमान संदर्भात काही अहवाल समोर आले त्यात डाॅ. देवेंद्र मस्की – डाॅ. संजय बयस यांचा २०२० मध्ये कृषी क्षेत्रातील अडचणी दाखवणारा, नाबार्डचा २०२३ चा अहवाल आले. केळी उत्पादकांच्या अडचणी स्पष्ट करणारा अहवाल अभिजीत साळुंखे यांनी जून २०२३ मध्ये केला होता. यापेक्षा वेगळ्या अहवालांचे संदर्भ समोर येत नाहीत. म्हणजेच ‘जेआयएसएल’ ने केलेल्या २०११ च्या अहवालानंतर तब्बल १४ वर्षांनी केळी उत्पादकांच्या नवतंत्र वापर, बहुमाध्यम वापर, केळी उत्पादन – उत्पन्नात वाढ आणि त्यांच्या राहणीमानात बदल याचा अभ्यास ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ : जळगाव जिल्हा)’ या संशोधन प्रबंधातून केला गेला.
या अभ्यासासाठी ‘जेआयएसएल’ चे शेती संशोधन कार्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य मिळाले. प्रश्नावली भरून घेताना आणि प्रगतशील शेतकऱ्यांच्या मुलाखती घेताना ‘जेआयएसए’ चे नवतंत्र वापरणाऱ्या शेतकऱ्यांचा वेगळा गट तयार केला. याच गटातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी बहुमाध्यमांमधून शेती नवतंत्राची माहिती मिळवून केळी लागवडीचे नवतंत्र स्वीकारले – वापरले हे मान्य करीत राहणीमान व जीवनशैलीतील बदलाची अनेक उदाहरणे समोर आणली. त्याचा सविस्तर आढावा संशोधन प्रबंधात घेतलेला आहे..
( पुढील भाग – प्रश्नावली आणि मुलाखती )



