
ख्यातनाम ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या अंतर्गत ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ : जळगाव जिल्हा) या विषयावर शोध प्रबंध सादर केला आहे. यातील सारांशाचा वाचा हा पाचवा भाग.

संशोधनाच्या कार्याने निश्चित असा वेग घेतला. कोरोनांच्या दीड वर्षांच्या काळात काहीही काम झालेले नव्हते. पण त्यात गेलेला वेळ भरून काढण्यासाठी सहा – सहा महिन्यांचे दोन प्रगती अहवाल (प्रोग्रेस रिपोर्ट) लागोपाठ तयार करणे भाग होते. त्याच अनुषांगेाने गाईड प्रा. डाॅ. सुधीर भटकर यांनी नेमके मार्गदर्शन केले. प्रारंभीच्या काळात विषयाशी संबंधित माहिती संकलन करणे हे सुद्धा प्रगतीतील कामच होते. त्यामुळे माझा संशोधन कार्याचा विषय ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ : जळगाव जिल्हा)’ यांच्याशी संबंधित पुस्तके, ग्रंथ गोळा करणे, विषयाशी संबंध असलेल्या संस्थांना भेटी देणे, तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेणे, पूरक अहवाल, लेखे, दस्तावेज गोळा करणे अशा कामांचाही समावेश करून प्रगती अहवाल सादर करण्यासाठी प्रयत्न केले. अर्थात, संदर्भ साहित्याविषयी गाईड यांची खात्री झाल्यानंतरच ते प्रगती अहवालावर सह्या करीत होते.
माझ्या संशोधन कार्याचे हेतू आणि उद्दिष्ट निश्चित झालेले होते. केळी उत्पादक शेतकरी शेतीशी संबंधित नवतंत्राची माहिती बहुमाध्यमांमधून घेतात आणि त्या माहितीचा वापर करून प्रत्यक्ष नवतंत्र शेत-शिवारात वापरून केळीचे उत्पादन – उत्पन्न वाढवितात. उत्पन्न वाढल्यानंतर ते स्वतःच्या आणि कुटुंबाच्या राहणीमानात व जीवनशैलीत बदल करतात. त्यांचा आर्थिक स्तर वाढल्यामुळे घरात आमरादायी सुख – सुविधा – साधने वापरात येतात, खर्च करण्याचे पर्याय वेगवेगळे पर्याय (जसे – पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी प्रसिद्ध शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश, घरांचे – बंगल्यांचे एैसपैस बांधकामे करणे, दुचाकी – चारचाकी महागडी वाहने घेणे, ब्रॅण्डेड कपडे – मोबाईल – दागिने घेणे, देश – विदेशात पर्यटन करणे, छंद – शौक पूर्ण करणे, पाल्यांच्या विवाह कार्यावर सढळहस्ते खर्च करणे, भूखंड – फ्लॅट खरेद करणे) केळी उत्पादक शेतकरी स्वीकारतात अशी तथ्ये संशोधातून समोर आणणे हाच माझा हेतू आणि त्या अनुषंगाने उद्दिष्ट निश्चित होते. हे कार्य सिद्ध करण्यासाठी संशोधन कार्य टप्प्या – टप्प्याने पुढे नेणे आवश्यक होते. हे कार्य पूर्ण करण्यासाठी संशोधन पद्धती समजून घेणे गरजेचे होते.

संशोधन कार्यात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्याच्याशी संबंधित शास्त्र (विज्ञान) – गणित – समाजशास्त्र आणि व्यवहार या संकल्पनाही संशोधकाला समजून घ्याव्या लागतात. शब्दांचा अर्थ शोधणे आणि त्यासाठीचे विविध संदर्भ मिळविणे यासोबतच संकल्पना स्पष्टीकरण – विश्लेषण हे कार्य अत्यंत संयमाने, शांतपणे करीत राहावे लागते. कोणताही विषय रेंगाळला वा प्रलंबित ठेवला तर पुढील कार्य खोळंबून जाते. त्यामुळे एकावेळी अनेक शब्द – संकल्पना यावर काम करीत राहावे लागते. हा नाही मिळाला तर दुसरा शोध, दुसरा नाही तर तिसरा शोध असे करीत काम पुढे जाते. कधी – कधी तिसऱ्या शब्दाच्या – संकल्पनेच्या शोधात पहिल्या न मिळालेल्या शब्द वा संकल्पनेचे संदर्भ सहज मिळून जातात. माझ्या बाबतीत असे बहुतेकवेळा रात्री – अपरात्री घडले. दिवसा एकाच दिशेने पुस्तके – ग्रंथ वाचन करताना हाती काहीही लागत नसे. मात्र रात्री एक झोप पूर्ण झाल्यानंतर तेच पुस्तक पुन्हा वाचताना आणि त्यातील माहितीशी संबंधित शोध इंटरनेटवरील संकेतस्थळांवर करताना पटापट संदर्भ समोर येत. तसे होऊ लागले की, मी शांतपणे लॅपटाॅपवर ऑपरेटिंगचे काम करीत असे. मी प्रारंभापासून काळजी घेतली, इंटरनेट माध्यमावर मिळालेले संदर्भ पीडीएफ वा जेपीजी स्वरुपात सेव्ह केले.
हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन भाग १ : शिक्षण आणि नोकरीशी संबंधित अनुभवांचा प्रवास !
माझ्या संशोधन प्रबंधात सात प्रकरणांमध्ये जवळपास १७०० वर संदर्भ वापरले आहेत. त्यापैकी जवळपास एक हजार संदर्भ माझ्याकडे पीडीएफ स्वरुपात असून ७०० संदर्भ आजही संकेत स्थळांवर उपलब्ध आहेत. माझ्या संशोधन विषयात बहुमाध्यमांचा वापर आणि त्याद्वारे होणारा जनसंवाद याचा अभ्यास होता. म्हणजेच मलाही बहुमाध्यमांचा वापर करणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन मी इंटरनेटचा अधिकाधिक उपयुक्त वापर करायचा प्रयत्न करीत गेलो. जे – जे संदर्भ मला इंटरनेटच्या संकेतस्थळांवर उपलब्ध झाले, त्याच्या लिंक सुद्धा मी काॅपी करून सेव्ह केल्या. संशोधनाच्या संदर्भ यादीत ठरलेल्या फाॅर्मेटनुसार त्या लिंक सुद्धा वापरल्या. म्हणूनच गाईडसोबत बाह्य परीक्षकांनी शोधप्रबंधाचे मूल्यांकन करताना आशयाविषयी कोणतीही शंका विचारली नाही. आशयातील अपूर्ण – अधुरेपणाविषयी सूचना केली नाही. गाईड प्रा. डाॅ. भटकर सुद्धा या कृतीविषयी समाधानी होते.
हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग २ – पीएच. डी. प्रवेशातील रंजकता
कोणत्याही संशोधन कार्याची पद्धती ही निश्चित टप्पेनिहाय पुढे जात असते. संशोधनाचा विषय निश्चित केल्यानंतर ते संशोधन कोणत्या विषयाशी संबंधित आहे ? हे ठरवावे लागते. संशोधनाचा कोणताही विषय हा प्रामुख्याने समाजशास्त्राची नवी संकल्पना समजला जातो. कारण प्रत्येक विषय हा कुठेना कुठे समाजाशी जुळलेला असतो. त्यामुळे अगोदर समाजशास्त्र आणि सामाजिक संशोधन संकल्पना समजून घ्यावी लागते. यानंतर संशोधन कार्याचा संबंध इतर शास्त्रांशी कसा आहे ? याचाही शोध घ्यावा लागतो. त्यात व्यावहारीक आणि आर्थिक संबंध तपासावे लागतात.
यानंतर संशोधन कार्याशी संबंधित उद्दिष्ट्ये निश्चित करावी लागतात. यासाठी संबंधित विषयावर झालेल्या संशोधन कार्याची तथ्ये – सिद्धान्त माहित करून घ्यावे लागतात. ताज्या स्थितीत त्याची पडताळणी करून घ्यावी लागते. पूर्वीच्या तथ्य – सिद्धान्तचे सामान्यीकरण करून घ्यावे लागते. त्यामागील कारणे, स्थिती, वास्तविकता, वस्तुस्थिती, सत्यता तपासावी लागते. संबंधित वाद – आक्षेप माहित करून घ्यावे लागतात. मिळालेल्या सर्व माहितीचे वर्गीकरण करावे लागते. यानंतर निश्चित केलेल्या विषयाशी संबंधित उद्दिष्ट्ये निश्चित करणे शक्य होते. संशोधन कार्याशी संबंधित उद्दिष्ट्ये मी निश्चित केली. त्यात बहुमाध्यमांची व्याप्ती अभ्यासणे, कृषी नवतंत्राची उपयुक्तता अभ्यासणे, बहुमाध्यमातून प्रसारित कृषी नवतंत्राच्या माहितीचा प्रसार – प्रचार अभ्यासणे, केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची सामाजिक पत, आर्थिकस्तर अभ्यासणे ही महत्त्वाची उद्दिष्ट्ये होती.
हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ३ – संशोधन कार्याचा वेगाने प्रारंभ !
यानंतर संशोधन कार्याच्या निष्कर्षाकडे नेणारी गृहीतकृत्ये निश्चित करणे आवश्यक होते. गृहितकृत्ये म्हणजे, संशोधन कार्य पूर्ण करून काय सिद्ध – साध्य करायचे आहे, त्याचे ठोस प्रतिपाद करणे. माझ्या संशोधन कार्याचे प्रामुख्याने चार गृहीतकृत्ये निश्चित होती. पहिले म्हणजे, केळी उत्पादक शेतकरी बहुमाध्यमांमधून केळी लागवडच्या नवतंत्राची माहिती मिळवून ती शेतीच्या कामात वापरतात, शेतीचे नवतंत्र उपयुक्त ठरल्यामुळे केळीचे उत्पादन वाढते, त्यानंतर केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते, केळी विक्रीतून शेतकऱ्यांना जादा उत्पन्न मिळाल्यांतर ते राहणीमानात बदल करतात. त्यातून केळी उत्पादकांची आर्थिक पत आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढते.
संशोधनासाठीची उद्दिष्ट्ये आणि गृहितके एकदा निश्चित झाल्यानंतर मुख्य तयारी असते ती संशोधन आराखडा तयार करण्याची. हा आराखडा म्हणजे, ‘पाच डब्लू’ (का, कोणासाठी, कुठे, काय, केव्हा) आणि ‘एक एच’ (कसा) चे उत्तर असते. या सहा प्रश्नांच्या उत्तरांची टप्पेनिहाय कार्यवाही म्हणजे संशोधन कार्य पूर्ण करणे. या आराखड्याचे चार घटक असतात. ती अशी – उद्दिष्ट्ये, विश्वसनीयता, सत्य आणि समान्यीकरण. बहुतांश संशोधन आराखडे हे अन्वेषणात्मक पद्धतीचे असतात. ही पद्धत म्हणजे, एखादा विषय िनश्चित करून त्या संबंधित सर्व विषयांची माहिती घेऊन विषयाच्या मूळाशी जावून नव्या तथ्यांचा – निष्कर्षांचा शोध घेणे. त्याची नव्याने मांडणी करणे.
हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ४ – संशोधन म्हणजे काय ?
माझ्या संशोधन कार्यासाठी अन्वेषणात्मक आराखडा तयार करणे आवश्यक होते. केळी उत्पादकांकडून होणारा बहुमाध्यमांचा वापर, केळी उत्पादकांसाठी उपयुक्त ठरणारे नवतंत्र, केळीच्या उत्पादक आणि उत्पन्नातील वाढ, त्यानंतर त्यांचे बदलणारे राहणीमान याचा अभ्यास सर्वप्रकारच्या उपविषयांचा आढावा घेऊनच करावा लागणार होता. यासाठी माझ्या विषयाशी संबंधित व या अगोदर प्रकाशित साहित्याचा आढावा घेणे, या अगोदर बहुमाध्यम व नवतंत्र वापर बाबत केळी उत्पादकांच्या अनुभवांचे सर्वेक्षण करणे, उपविषयांचा (अंतर्दृष्टीस चालना देणारे) अभ्यास करणे आवश्यक होते. याशिवाय नियोजित संशोधन आराखड्यात अध्ययन क्षेत्र, अध्ययनाचे महत्त्व, तथ्य संकलन पद्धत, तथ्य संपादन, तथ्य वर्गीकरण, तक्ते तयार करणे, तथ्य विश्लेषण आणि त्यातून समोर येणाऱ्या नव्या तथ्यांचे वा निष्कर्षांचे लेख करणे हे महत्त्वाचे व टप्पेनिहाय कार्य होते. तथ्य संकलासाठी प्रश्नावली आणि मुलाखत तंत्राचा वापर करण्याचेही निश्चित केले. प्रश्नावलीसाठी आणि मुलाखंतीसाठी प्रश्नांची यादी केली.
अशा पद्धतीने संशोधन कार्याचा आराखडा तयार झाला. केळी उत्पादक शेतकरी बहुमाध्यमातून नवतंत्राची माहिती मिळवितात आणि त्याचा वापर करून केळीचे उत्पादन – उत्पन्न वाढवतात यासह त्यांचे राहणीमान सतत बदलत असते हे सिद्ध करण्यासाठी परिपूर्ण अन्वेषण आराखडा तयार केला. त्याची बारकाव्याने तपासणी गाईड प्रा. डाॅ. भटकर यांनी केली. त्यानुसार पुढील कार्यवाहीस प्रारंभ करण्यात आला. माहिती मिळविणे, प्रश्नावली भरणे, मुलाखती घेणे यासाठी केळी लागवड करणारे शेतकरी, पत्रकार – संपादक, कृषीतज्ज्ञ हे घटक आणि जळगाव जिल्हा हे कार्यक्षेत्रही निश्चित करण्यात आले.
माझ्या संशोधनाचा विषय प्रामुख्याने केळी उत्पादक शेतकरी नवतंत्रज्ञानाची माहिती मिळविण्यासाठी बहुमाध्यमे वापरतात, बहुमाध्यमातून मिळालेली माहिती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते, नवतंत्र वापरून शेतकरी केळी लागवड करतात, त्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढते, वाढीव पैसा हाती आल्यानंतर त्यांचे जीवनमान – जीवनशैली – राहणीमान बदलते याचा शोध मला घ्यायचा होता. माझा विषय हा माध्यम संशोधन, शेतीचे नवतंत्र आणि उत्पादन वाढ म्हणजे कृषी – शेती संशोधन, शेतकऱ्यांच्या राहणीमानात बदल म्हणजे सामाजिक – अर्थशास्त्राशी संबंधित होता. त्यामुळे मला माझा संशोधन आराखडा सावधपणे – काळजीपूर्वक तयार करणे आणि त्यानुसार कार्यावाही करीत संशोधन पूर्ण करणे भाग होते.
( पुढील भाग – बहुमाध्यमांचा प्रभावाचा अभ्यास )



