Home Agri Trends मी आणि माझे संशोधन : भाग ३ – संशोधन कार्याचा वेगाने...

मी आणि माझे संशोधन : भाग ३ – संशोधन कार्याचा वेगाने प्रारंभ !


ख्यातनाम ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या अंतर्गत ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ : जळगाव जिल्हा) या विषयावर शोध प्रबंध सादर केला आहे. यातील सारांशाचा वाचा हा तिसरा भाग.

पीएच. डी. चे माझे संशोधन खऱ्या अर्थाने डिसेंबर २०२१ मध्ये सुरु झाले आणि नोव्हेंबर २०२५ मध्ये मला पीएच. डी. पूर्ण केल्याचे नोटीफिकेशन मिळाले. याचाच अर्थ अवघ्या चार वर्षांत माझे संशोधन कार्य पूर्ण झाले. खरेतर तर विद्यापिठ अनुदान आयोगाने (यूजूसी) पीएच. डी. पूर्ण करण्याचा काळ कमीत कमी तीन वर्षे व जास्तीचा काळ सहा वर्षे निश्चित केलेला आहे. आता पीएच. डी. प्रवेशाचे निकष सुद्धा बदलले आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातील संशोधन विभागाच्या नियंत्रणात, जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातून आणि गाईड प्रा. डाॅ. सुधीर भटकर यांच्या मार्गदर्शनात माझे पीएच. डी. संशोधनाचे कार्य वेगात सुरु झाले.

पीएच. डी. चा प्रारंभाचा भाग हा बराचसा तांत्रिक व पुस्तकी अभ्यासातून माहिती संकलनाचा आहे. संशोधनासाठी निश्चित केलेल्या विषयावर वा त्याच्याशी संबंधित विषयांवर अगोदर काही संशोधनाचे कार्य झाले आहे का ? याची माहिती मिळविणे आवश्यक असते. पूर्वी अशी माहिती ग्रंथालयांमधील पुस्तके, ग्रंथ चाळून – वाचून मिळत असे. पूर्व प्रकाशित साहित्याचा आढावा हा एक महत्त्वाचा मुद्दा संशोधन कार्यात असतोच. आता इंटरनेटच्या वेगवान व प्रभावी वापरामुळे पूर्वीच्या संशोधन कार्याचे संदर्भ थेट पीडीएफ फाईल स्वरुपात उपलब्ध होतात. संशोधन लेखांचे सारांश वा संपूर्ण प्रबंध प्रसिद्ध करणाऱ्या विविध संस्थांच्या पोर्टलवर मोफत वा पेड स्वरुपात माहिती उपलब्ध होते.

पत्रकारितेच्या मूळ प्रवाहात काम करीत असताना मी संगणकीय प्रणाली व इंटरनेटशी संबंधित कौशल्ये आत्मसात केलेली होती. त्यामुळे माहिती संकलन हा विषय माझ्यासाठी सहज व सोपा होता. माझ्या संशोधन विषयाशी संबंधित अधिकृत, विश्वासार्ह असे पीडीएफ स्वरुपातील एक हजारावर संदर्भ मी गेल्या तीन वर्षांत मिळविले. आजही ते एका फाईल फोल्डरमध्ये सेव्ह केले आहेत. याशिवाय विषयाशी संबंधित प्रत्येक शब्द व संकल्पना स्पष्ट करण्यासाठी शेकडोने संदर्भ हवे असतात. संशोधकाला स्वतःला किती समजले – उमजले आहे हे त्याच्या प्रत्येक प्रकरण लेखनातून गाईडला समजत जाते.

विद्यापीठाच्या डेस्कटॉपवरील नोंदी

पीएच. डी. चे संशोधन कार्य हे विद्यार्थी व गाईड यांना परस्परांत जेवढ्या गतीने समजत जाते तेवढ्या गतीने कार्य पूर्ण होत जाते. याबाबतीत गाईड प्रा. डाॅ. सुधीर भटकर यांची कार्यपद्धती उपयुक्त ठरली. स्वतःचे समाधान आणि लेखनातील शंकांचे निरसन झाल्याशिवाय पुढील कार्याला ते परवानगी देत नसत. विविध संदर्भांचे तपशील योग्य पद्धतीने आहेत का ? हे प्रा. डाॅ. भटकर स्वतः तपासून घेत. बऱ्याचवेळा मला लेखनात बदल करायला लावत. पण त्यामुळे माझाही संशोधन विषय आणि पूरक विषयांचा पक्का अभ्यास होत असे. ही बरीच तांत्रिक आणि वेळ घेणारी क्रिया आहे, मात्र ती क्रिया संशोधन कार्याचे पायाभूत सूत्र पक्के करणारी असते. भविष्यात बाह्य परीक्षक संशोधन कार्याचे मूल्यांकन – परिक्षण – तपासणी – वाचन करीत असताना काय – काय शंका – प्रश्न विचारू शकतात ? याचा अंदाज घेत गाईडने विद्यार्थ्याकडून संशोधन कार्य पूर्ण करून घ्यायचे असते. हाच अनुभव पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने येत गेला.

हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन भाग १ : शिक्षण आणि नोकरीशी संबंधित अनुभवांचा प्रवास !

संशोधनासाठी निश्चित केलेला विषय ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ : जळगाव जिल्हा)’ याची संशोधन कार्याची रुपरेषा निश्चित करून ती विद्यापीठातील संशोधन विभागात ४ डिसेंबर २०२१ रोजी सादर केली. त्या रूपरेषेला संशोधन विभागाने लगेचच ८ डिसेंबर २०२१ ला मान्यता दिली. त्यानंतर पीएच. डी. पात्रतेसाठीच्या कागदपत्रांची पूर्तता आणि प्रवेश कायम करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागली. त्यानंतर दर सहा महिन्यांनी संशोधन कार्याचा अहवाल संशोधन विभागात सादर करण्याची अट टाकण्यात आली. ही पूर्तता विद्यापिठाच्या पोर्टलवर युजर नेम व पासवर्ड वापरून करायची होती. त्यानुसार संशोधन कार्याने गती घेतली. मध्यंतरी विद्यापीठात मला चारित्र्य प्रमाणपत्र सुद्धा सादर करावे लागले.

हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग २ – पीएच. डी. प्रवेशातील रंजकता

संशोधन कार्य पुढे नेण्यासाठी मार्गदर्शक प्रा. डाॅ. भटकर यांनी आराखड्याच्या रूपरेषेत सात प्रकरणे मला निश्चित करू दिली होती. त्यानुसार पहिले प्रकरण ‘प्रस्तावना’, दुसरे प्रकरण ‘संशोधन पद्धती’, तिसरे प्रकरण ‘बहुमाध्यमे’, चौथे प्रकरण ‘शेतीचे नवतंत्रज्ञान आणि वापर’, पाचवे प्रकरण ‘जेआयएसएल आणि कृषी नवतंत्रज्ञान’, सहावे प्रकरण ‘प्रश्नावली आणि मुलाखतींचे विश्लेषण’ आणि आठवे प्रकरण ‘निष्कर्ष’ असे होते. याशिवाय अभ्यासलेली ग्रंथ, पुस्तके याची यादी, विषयाशी संबंधित चर्चा केलेल्या संपादक, पत्रकार, कृषीतज्ज्ञ, प्रगतशील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलाखती, फोटो, संशोधनपर प्रसिद्ध दोन लेखांची प्रमाणपत्रे, संशोधन विषयाशी संबंधित इतर लेखनाचे संदर्भ हे सुद्धा सादर करायचे होते. म्हणजेच काम भरपूर होते. त्यासाठी मेहनत – परिश्रम सुद्धा भरपूर करावे लागणार होते.

संशोधन प्रबंधाचा प्रोग्रेस रिपोर्ट

प्रत्येक प्रकरणाचे लेख करण्याविषयी गाईड प्रा. डाॅ. भटकर यांच्याकडून अनुक्रमणिका निश्चित करावी लागत असे. अनुक्रमणिकेतील उपविषयांचा क्रम निश्चित करावा लागत असे. नंतर त्या विषयाशी संबंधित व्याख्या, स्पष्टीकरणे शोधावी लागत. त्याचा संशोधन कार्याशी संबंध स्पष्ट करावा लागत असे. कोणतेही संदर्भ थेट जसेच्या तसे वापरता येत नसत. संशोधकाला स्वतःच्या भाषेत संदर्भ बदलून घ्यावे लागत. मात्र त्या सर्व संदर्भाचा उल्लेख शिर्षक, लेखकाचे नाव, पुस्तक – ग्रंथाचे नाव, पान क्रमांक, आवृत्ती वर्ष, प्रकाशक अशा क्रमाने संदर्भसूचीत करावा लागत असे. हे काम सावधपणे, चौकसपणे करावे लागत असे. सर्वाधिक काळजी संशोधन कार्य व विषय – शब्द – संकल्पना यांच्या व्याख्या लेखन करताना घ्यावी लागत असे. पूर्वीच्या अनेक संशोधकांनी केलेल्या व्याख्या पूरक असत. पण संशोधन कार्याशी संबंधित अर्थच लेखनात समाविष्ट करणे आवश्यक असे. अशावेळी तारतम्य, समज, अनुभव याचा वापर करून लेखन करावे लागत असे.

बऱ्याचवेळा लेखनाचे (खरे तर संगणकावर थेट ऑपरेटिंगचे) काम वेळ घेणारे असे. भरपूर ऑपरेटिंग झाल्यानंतर लक्षात येत असे, की हे निरर्थक आहे, याचा संशोधन विषयाशी संबंध नाही. ते काम वगळावे लागे किंवा डिलीट करावे लागे. पुन्हा नवे संदर्भ शोधावे लागत. वेळ घेणारे, मेंदूला क्षीण आणणारे, उत्साहावर विरजण घालणारे असे काही प्रकार होत. पण पीएच. डी. पूर्ण करायची ही जिद्द ऊर्जा देत असे. मी प्रारंभापासून एक पथ्य पाळले. जेव्हा – जेव्हा पीएच. डी. कार्य पुढे नेण्याची इच्छा होत असे तेव्हा तेव्हा मी काम करीत असे. कधी रात्री – अपरात्री दोन – तीन वाजता. कधी भल्या पहाटे चार पासून. कधी – कधी भर दुपारी दोन वाजता मोबाईलवर टायपिंग करून घेत असे. माझ्या कामाचे स्थान पहिल्या मजल्यावर होते. तेथे कोणताही अडथळा येत नसे. मोबाईल, संगणक, इंटरनेट या प्रणालींशी संबंधित सर्व कामांचे कौशल्य माझ्याकडे होते, त्यामुळे जमेल तेव्हा आणि शक्य तेथे मी संशोधन कार्याचे लेखन करून घेत असे. म्हणूनच माझ्या कामाचा वेग शेवटपर्यंत टीकून रािहला. माझे संशोधन कार्य रेंगाळले नाही.

संशोधन कार्याच्या सहामाहीचा पहिला प्रगती अहवाल ३ मे २०२१ ला, दुसऱ्या प्रगती अहवाल ४ नोव्हेंबर २०२१ ला, तिसरा प्रगती अहवाल ४ मे २०२२ ला, चौथा प्रगती अहवाल ६ नोव्हेंबर २०२२ ला, पाचवा प्रगती अहवाल ६ मे २०२३ ला, सहावा प्रगती अहवाल २ नोव्हेंबर २०२३ ला, सातवा प्रगती अहवाल २ मे २०२४ ला आठवा प्रगती अहवाल २ नोव्हेंबर २०२४ ला आणि अखेरचा नववा प्रगती अहवाल ११ फेब्रुवारी २०२५ ला सादर केला. जवळपास ५१ महिन्यांमध्ये (४ वर्षे ३ महिन्यांमध्ये) संशोधन प्रबंध लेखनाचे काम पूर्ण झाले. ही कार्यवाही सुरु असताना मला प्रगती अहवालाच्या प्रतींवर गाईड प्रा. डाॅ. भटकर व को – गाईड प्रा. डाॅ. महाजन यांच्या सह्या घ्याव्या लागत होत्या. जेव्हा की, सर्व प्रकरणांची प्रगती, त्याची तपासणी हे कार्य प्रा. डाॅ. भटकर हेच करीत होते. ही बाब लक्षात घेऊन मी स्वतः प्रा. डाॅ. महाजन यांना को – गाईड म्हणून त्यांचे नाव वगळण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी १३ फेब्रुवारी २०२४ ला नाव वगळण्याचे पत्र प्र कुलगुरूंना दिले. नंतर १२ मार्च २०२४ ला नाव वगळण्याची प्रक्रिया पार पडली. हा निर्णय माझ्यासाठी दिलासादायक होता. त्यानंतर प्रा. डाॅ. भटकर यांच्याच मार्गदर्शनात शेवटपर्यंतचे संशोधन कार्य पूर्ण झाले. याच कालावधीत विद्यापिठाकडे किमान ७० हजार रुपयांचे शुल्क भरावे लागले.

प्रोग्रेस रिपोर्टवर मार्गदर्शकाची सही आणि अभिप्राय

याच दरम्यान ३० केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. ५०० वर केळी उत्पादकांकडून प्रश्नावली भरू घेतली. सात संपादकांच्या (२ दैनिके, २ साप्ताहिके, २ मासिके, १ पोर्टल) मुलाखती घेतल्या. याशिवाय ५ कृषी संशोधकांच्या मुलाखती घेतल्या. जळगाव येथील ‘जेआयएसएल’ च्या कृषी संशोधन केंद्रात वारंवार भेटी देऊन केळी लागवडशी संबंधित ऊती संवर्धित रोपे, लागवडची वाफा पद्धत, सिंचन व द्रव खते देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतींचा वापर, पिकांची वाढ आणि घ्यावयाची काळजी, केळी घडांची वाढ, त्याचे संरक्षण, घडांची संख्या नियंत्रणात ठेवणे, काढणीसाठीची प्रक्रिया अशा नवतंत्रांची माहिती घेत प्रात्यक्षिके पाहिली. केळी उत्पादकांच्या शेतात, घरात भेटी देऊन पाहणी केली. भविष्यातील बंदीस्त केळी लागवड कशी असेल ? याचीही माहिती घेतली. सावदा येथील केळी पॅकिंग सेंटर, जळगाव येथील केळी संशोधन केंद्र येथे वारंवार भेटी दिल्या. केळी विक्री संदर्भातील माहिती घेण्यासाठी यावल, रावेर, मुक्ताईनगर येथील ‘केला सप्लायर गृप चालकांशी’ चर्चा केली. जिल्ह्यात गेल्या १५ – २० वर्षांत केळी उत्पादनात प्रगतशील शेतकरी म्हणून नावलौकीक असलेल्या ५० शेतकऱ्यांची यादी मिळविली.

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या राहणीमानाचा अभ्यास करायचा असल्यामुळे मुलाखती घेतलेल्या सर्वच केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि प्रश्नावली भरून घेतलेल्या काही केळी उत्पादकांच्या घर, निवास, बंगल्यांना भेटी दिल्या. त्यांच्या राहणीमानातील – जीवनशैलीतील सुविधा, सुख – सोयी याची नोंद घेतली. कुटुंबियांची माहिती घेताना आवड – निवड, शिक्षण, पर्यंटन, छंद, कला – कौशल्य, विवाह, हौस – मौज, बचत, गुंतवणूक व सढळ हस्ते खर्च याचाही आढावा घेतला. केळी उत्पादक शेतकऱ्यांना समाजात मान – सन्मान कसा मिळतो हे जाणून घेतले. इतर आवांतर प्रश्न विचारून त्यांच्या राहणीमानाचा उच्च, अती उच्च स्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

संशोधनाच्या विषयात केळी उत्पादकांकडून बहुमाध्यमांद्वारे केला जाणारा जनसंवाद आणि त्याचा उपयोग हा विषय सुद्धा होता. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी पारंपारिक माध्यमे जशी वृत्तपत्रे – साप्ताहिके, मासिके यात शेतीविषयी प्रसिद्ध कोणती माहिती वाचतात, टीव्हीवरून शेतीशी संबंधित प्रसारित होणारे कोणते कार्यक्रम पाहतात, इंटरनेट सेवा असलेल्या मोबाईल – संगणक – टॅब या माध्यमांचा वापर कोणती माहिती, कोणत्या स्वरुपात मिळवायचा प्रयत्न करतात याचाही आढावा घेतला. केळी उत्पादक शेतकरी बहुमाध्यमांचा प्रभावीपणे वापर करतात, हे वारंवार सिद्ध होत गेले.

संशोधनाशी संबंधित सर्व टप्पे आणि कार्य मी वेगाने पूर्ण करीत आलो. शेवटचा सहामाही प्रगती अहवाल सादर केल्यानंतर सर्वांत महत्त्वाचे काम होते, संशोधन कार्याचा मराठी व इंग्रजी भाषेत सारांश (सिनोप्सिस) सादर करणे. हे काम फेब्रुवारी २०२५ मध्ये पूर्ण केले. माझ्या संशोधन कार्याचा इंग्रजी भाषेतील सारांश माझी आत्येबहिण प्रा. डाॅ. सौ. श्रद्धा राजेंद्रप्रसाद अवस्थी (मिसर) हिने लक्ष घालून तयार करू दिला. त्यामुळे माझे एक महत्त्वाचे काम हलके झाले. या पुढील कार्यवाहीत विद्यापिठातील सहकारी डाॅ. सोमनाथ वडनेरे यांचे भरपूर सहकार्य मिळत गेले. पुढील प्रत्येक टप्पा पूर्ण करून घेण्यात प्रा. डाॅ. भटकर यांच्यासोबत डाॅ. वडनेरे क्रियाशील होते. गरजेच्यावेळी प्रा. डाॅ. गोपी सोरडे यांनीही मदतीचा हातभार लावला.

यानंतर संशोधन प्रबंधाचा कच्चा मसुदा (प्रायमरी ड्राफ्ट) सादर करण्याची प्रक्रिया होती. गाईड प्रा. डाॅ. भटकर यांनी अत्यंत बारकाव्याने सर्व सात प्रकरणे व जोड पत्रांची तपासणी केली. काही तांत्रिक बदल करावे लागले. काही प्रकरणांमधील आशय तपासून त्यात दुरूस्तीचे काम केले. त्यानंतर एप्रिल २०२५ मध्ये संशोधन प्रबंधाचा कच्चा मसुदा सादर केला. त्यानंतर संशोधन कार्याविषयीचे पहिले सादरीकरण व तोंडी मुलाखत जून २०२५ मध्ये पार पडले. यासाठी २ बाह्य परीक्षक व १ अंतर्गत परीक्षक होते. त्यांनी काही सूचना केल्या. त्याची पूर्तता गाईड प्रा. डाॅ. भटकर यांनी करून घेतली. या समितीच्या सूचनांची पूर्तता केल्यानंतर शोधप्रबंधाचा अंतिम मसूदा (फायनल थिसीस) सादर करण्याचे काम सुरु झाले. हे काम फारच तांत्रिक व ठराविक आराखड्यातील होते. मी स्वतः संगणकावर रचना करण्याचे कौशल्य आत्मसात केलेले असल्यामुळे मला फारशी अडचणी आल्या नाहीत.

शोधप्रबंधाचा अंतिम मसुदा तयार केल्यानंतर ‘कबचौउमवि’ तील ग्रंथालयातून वाड.मय चौर्य (प्लॅगारिझम रिपोर्ट) मिळवावा लागला. शोधप्रबंध लेखानाचे सर्व कार्य (जवळपास ८९० वर पाने) मी स्वतः काळजीपूर्वक केलेले असल्यामुळे ० टक्के रिपोर्ट आला. यानंतर संशोधन प्रबंध फायनल होण्यावर शिक्का मोर्तब झाला. शोधप्रबंध विद्यापिठाच्या पोर्टलवर अपलोड केला. यानंतर अखेरची कार्यवाही फायनल प्रेझेंटेशन व तोंडी मुलाखत होती. यासाठी बाहेरून समिती चेअरमन व एक परिक्षक होते. वेळ वाचविण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया होणार असा निरोप मिळाला. यानंतर १६ ऑक्टोबर २०२५ ला फायनल मुलाखत झाली. मुलाखत संपत असताना समिती चेअरमन यांनी माझे अभिनंदन करून तुम्हाला पीएच. डी. प्रदान करण्यासाठी शिफारस करीत असल्याची आनंदाची बातमी दिली. यानंतर मा. कुलगुरू, मा. प्र कुलगुरू, गाईड यांच्या उपस्थितीत मला पीएच. डी. मान्यतेचे नोटीफेकेशन प्रदान करण्यात आले. त्यानंतर २३ डिसेंबर २०२५ ला पदवी प्रदान सोहळा होणार हे सुद्धा जाहीर झाले.

( पुढील भाग – संशोधन म्हणजे काय ?…)


Protected Content

Play sound