मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरात भंगार वाहतूक करणाऱ्या दहा चक्का ट्रकच्या प्रकरणामुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संशयास्पद स्वरूपात भंगार वाहतूक होत असल्याची ठोस माहिती देऊनही पोलिसांकडून केवळ औपचारिक आणि वरवरची चौकशी करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
MH 20 CT 8001 क्रमांकाच्या ट्रकमध्ये महावितरण (एमएसईबी) च्या तारांचे बंडल भरले जात असल्याची गोपनीय माहिती नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली होती. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असतानाही या प्रकरणाची सखोल चौकशी न करता ट्रकला मोकळे सोडण्यात आल्याने संशय अधिकच बळावला आहे. सरकारी मालमत्तेच्या संभाव्य चोरीचा संशय असताना तपासात इतकी हलगर्जी का दाखवली गेली, असा सवाल उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी संबंधित ट्रक ताब्यात घेतला होता. मात्र ट्रकमधील भंगार संपूर्णपणे खाली न करता केवळ वरवर पाहणी करण्यात आली आणि कोणताही सविस्तर पंचनामा न करता ट्रक पुन्हा सोडण्यात आला. या प्रकारामुळे “नेमकी कसली चौकशी करण्यात आली?” असा थेट प्रश्न नागरिक विचारत आहेत.
जर ट्रकमध्ये काहीही आक्षेपार्ह नव्हते, तर ट्रक पूर्णपणे रिकामा करून पंचनामा का करण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महावितरणसारख्या शासकीय यंत्रणेच्या तारांबाबत संशय असताना इतक्या घाईने निर्णय का घेण्यात आला, तसेच भंगार वाहतुकीसाठी आवश्यक परवाने, अधिकृत कागदपत्रे आणि कायदेशीर प्रक्रिया तपासली गेली का, याबाबतही पोलिसांकडून कोणतेही स्पष्ट उत्तर मिळालेले नाही.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, पोलिसांनी जर प्रामाणिक, पारदर्शक आणि सखोल तपास केला असता तर सर्व संशय दूर झाले असते. मात्र अपूर्ण तपासणीमुळे संभ्रम वाढला असून, या प्रकरणात काहीतरी दडपण्याचा प्रयत्न होत आहे का, अशी चर्चा आता खुलेआम सुरू झाली आहे.



