Home Agri Trends मी आणि माझे संशोधन : भाग २ – पीएच. डी. प्रवेशातील...

मी आणि माझे संशोधन : भाग २ – पीएच. डी. प्रवेशातील रंजकता !


ख्यातनाम ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या अंतर्गत ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ : जळगाव जिल्हा) या विषयावर शोध प्रबंध सादर केला आहे. यातील सारांशाचा वाचा हा दुसरा भाग.

जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातील संशोधन विभागातून मी पीएच. डी. पूर्ण केली आहे. सन २०१९ ते सन २०२५ अशा सहा वर्षांच्या कालावधीत माझे पीएच. डी. चे कार्य पूर्ण झाले. माझ्या पीएच. डी. संशोधाचा विषय आहे, ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ : जळगाव जिल्हा)’. हा विषय बहुमाध्यम संशोधन, कृषी क्षेत्रातील नवतंत्र संशोधन आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानातील बदलांचे संशोधन अशा तीन विषयांशी संबंधित आहे.

सन २०१९ च्या एप्रिलमध्ये सुरु झालेले पीएच. डी. चे कार्य २०२५ च्या नोव्हेंबरमध्ये म्हणजे सहा वर्षे सात महिन्यांत पूर्ण झाले. २३ डिसेंबर २०२५ ला विद्यापिठाच्या ३४ व्या दीक्षांत समारंभात पीएच. डी. पदवी हातात मिळाली. पीएच. डी. चे नोटीफिकेशन हातात आल्यानंतर अनेक हितचिंतक, मित्र, परिचितांनी संशोधन कार्याचा विषय काय आहे ? कशा संदर्भात संशोधन आहे ? पत्रकारिता, कृषी आणि सामाजिक अभ्यास याचा काय संबंध ? असे मूलभूत प्रश्न मला विचारले आहेत. त्यामुळे संशोधन कार्याची माहिती सर्वांपर्यंत नेमकेपणाने पोहचावी यासाठी ‘मी आणि माझे संशोधन’ या विषयावर लेखमालेचा निर्णय घेतला आहे. यात क्रमाने विषय पुढे येतील.

पेट परिक्षेत एक्झांमशन मिळाल्याचे पत्र.

सन २०१९ मध्ये मी पीएच. डी. प्रवेशासाठी प्रयत्न सुरु केले. तेव्हा पीएच. डी. प्रवेशासाठी पात्रता परीक्षा (पीएच. डी. एन्ट्रन्स टेस्ट – पेट) देण्याची आवश्यकता होती. मात्र एखाद्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तिचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन त्याला पेट परीक्षेत एक्झमशन (परीक्षा न देण्याची सवलत) देण्याचा अधिकार मा. कुलगुरूंना होता. सन २०१९ मध्ये विद्यापिठाचे कुलगुरू प्रा. डाॅ. पी. पी. पाटील सर होते. त्यांचा माझ्यावर व्यक्तिगत स्नेह होता. जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष मी असताना कुलगुरू पाटीलसर यांचा पहिला नागरी सत्कार संघाने केला होता. पत्रकारितेतील माझ्या २७ वर्षांच्या अनुभवाची सविस्तर माहिती देणारे पत्र मा. कुलगुरू यांना देवून पेट परीक्षेत मला एक्झमशन देण्याची विनंती केली. त्यांनी त्या विनंतीचा सकारात्मक विचार करून पीएच. डी. साठी मला थेट पात्र ठरवून इतर प्रशासकिय पूर्तता करण्याचे सूचविले होते.

एप्रिल २०१९ मध्ये पत्रव्यवहार सुरु झाला. मध्यंतरी जळगाव येथील भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनने पीएच. डी. साठी मला फेलोशिप देण्याचे पत्र मा. कुुलगुरू यांना दिले. यानंतर जून २०१९ मध्ये विद्यापिठाच्या पात्रताधारक उमेदवारांच्या यादीत माझे नाव ‘जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाच्या’ उमेदवारांमध्ये प्रकाशित झाले. यानंतर पुढील कार्यवाही सुरु होणे अपेक्षित होते. याच काळात जगासह संपूर्ण देशावर कोरोना महामारीमुळे प्रचंड तणावाचे संकट आले. पीएच. डी. प्रवेशाची पुढील कार्यवाही थंडावली.

सन २०२० मध्ये नोव्हेंबर पर्यंत म्हणजे सव्वा वर्ष काहीही कार्यवाही झाली नाही. याच दरम्यान आणखी एक अडचण समोर आली. ती म्हणजे, माझ्यासाठी मार्गदर्शक गाईड उपलब्ध करून देण्याची. त्या काळात ‘कबचौउमवि’ सह राज्यातील इतर विद्यापिठांमधील ‘जनसंवाद आणि पत्रकारिता’ विभागात गाईड उपलब्ध नव्हते. ‘कबचौउमवि’ च्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात एक मात्र गाईड प्रा. डाॅ. सुधीर भगवान भटकर होते. त्यांच्याकडे पीएच. डी. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुरेशी होती. माझ्यासह इतर विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे संशोधन कार्यासाठी सोपविण्यात ‘यूजीसी’ च्या संख्यात्मक मर्यादेची अडचण होती.

मुख्य मार्गदर्शकांच्या नियुक्तीचे पत्र

या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी जानेवारी २०२१ मध्ये तेव्हाचे प्र कुलगुरू प्रा. डाॅ. पी. पी. माहुलीकर, तेव्हाचे कुलसचिव प्रा. डाॅ. बी. व्ही. पवार सर, पीएच. डी. पूर्व प्रशिक्षण वर्ग समिती प्रमुख प्रा. ए. बी. चौधरी, संशोधन विभागाचे उपकुलसचिव व्ही. व्ही. तळेले यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. इंटर – डिसिप्लिनरी स्टडीज् अंतर्गत मला समाविष्ट करून माझे गाईड म्हणून जळगाव येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजशास्त्र महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य प्रा. डाॅ. यशवंत महाजन यांना जानेवारी २०२१ मध्ये पत्र दिले. प्रा. डाॅ. महाजन यांनीही त्यानुसार कार्यवाही सुरु केली. संशोधन कार्यासाठी माझा विषय ‘नवतंत्रज्ञानाचा केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन’ हा निश्चित झाला. हे ठरल्यानंतर संशोधनाचे माझे कार्य सुरु होईल अशी मला अपेक्षा होती.

या काळात कोरोना महामारीचा प्रभाव वाढत होताच. त्यामुळे पीएच. डी. पूर्व कोर्स वर्कचे कार्य फेब्रुवारी २०२१ मध्ये (म्हणजे १ वर्ष ८ महिन्यांनी) झाले. तीन दिवसांचा ऑनलाईन पीएच. डी. पूर्व कोर्स वर्क झाला. संशोधन कार्य, त्याच्या व्याख्या, त्याची व्याप्ती, संशोधनाचा विषय आणि त्याअनुषंगाने करायचे कार्य, मुलाखती घेणे, प्रश्नावली भरणे, विश्लेषणाच्या पद्धती, निष्कर्षाजवळ पोहचणे, संशोधन प्रबंध लेखन अशा कार्यपद्धतीचे प्रशिक्षण या ऑनलाईन वर्गातून मिळाले. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा झाली. त्याचे गुणपत्रक, प्रमाणपत्र सुद्धा मिळाले.

यानंतर प्रा. डाॅ. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जुलै २०२१ मध्ये मी दोन सेमिनार सादर केले. पहिल्या सेमिनारचा विषय होता, ‘कृषी क्षेत्रात मोबाईलचा प्रभावी वापर’ आणि दुसऱ्या सेमिनारचा विषय होता, ‘केळीमुळे कृषी आधारित क्षेत्रांचा विकास’. या सोबतच संशोधनासाठी निश्चित केलेल्या विषयाची रुपरेषा तयार केली. त्याचे ऑनलाईन सादरीकरण ‘संशोधन आणि मान्यता समिती’ (रिसर्च अँड रेकग्निशन कमिटी – आरआरसी) समोर करण्यात आले.

या प्रेझेंटेशनचे मूल्यांकन करण्यासाठी समितीत ‘कबचौउमवि’ च्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. डाॅ. भटकर होते. त्यांनी एक मुद्दा मांडला. तो होता, ‘तिवारी हे जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांच्या संशोधनाचा विषय हा पत्रकारिता किंवा माध्यमांशी संबंधित असावा.’ प्रा. डाॅ. भटकर यांचा मुद्दा योग्य होता. माझ्या संशोधनाचा विषय हा समाजकार्य या शाखेशी संबंधित झालेला होता. त्यात पत्रकारिता – माध्यमे हा विषय नव्हता. त्यानंतर माझ्या आरआरसी क्लिअरन्समध्ये अडचण निर्माण झाली. ठरलेल्या विषयाला मान्यता मिळू शकत नव्हती.

आता विद्यापिठातील संबंधित मान्यवर अधिकारी मंडळ आणि माझ्यासमोर एकच पर्याय होता, तो म्हणजे, माझ्या संशोधन कार्यासाठी जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचा गाईड मिळविणे आणि त्याच्या कडून संशोधनाचा विषय निश्चित करणे. अखेर मी स्वतः सप्टेंबर २०२१ ला विद्यापिठाच्या कुलसचिव यांच्याकडे अर्ज करून जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातील गाईडची मागणी केली. त्यानंतर कुलसचिव आणि आरआरसीतील मान्यवरांनी ‘कबचौ उमवि’ तील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातील गाईड प्रा. डाॅ. भटकर यांच्याकडे पीएच. डी. चे तीन अतिरिक्त विद्यार्थी वाढविण्याचा विशेष ठराव विद्यापिठाच्या विद्या परिषदेच्या (अॅकेडमिक कौन्सिल) समितीत केला. नंतर प्रा. डाॅ. भटकर यांच्यासह मलाही तसे पत्र नोव्हेंबर २०२१ मध्ये देण्यात आले.

मात्र हे करीत असताना या अगोदर मला दिलेले गाईड प्रा. डाॅ. महाजन यांना को – गाईड करण्यात आले. म्हणजेच माझे संशोधन कार्य दोन मार्गदर्शकांच्या नेतृत्वात सुरु झाले. प्रा. डाॅ. भटकर माझे मुख्य गाईड झाल्यानंतर त्यांनी माझ्या संशोधन कार्याचा विषय पुन्हा नव्याने निश्चित केला. तो झाला, ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ : जळगाव जिल्हा)’ ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर माझी पीएच. डी. कार्यासाठी ऑनलाईन कन्फर्म झाली.

प्रा. डाॅ. भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी डिसेंबर २०२१ मध्ये संशोधनाची रुपरेषा नव्याने तयार केली. यावर मुख्य गाईड म्हणून प्रा. डाॅ. भटकर व को – गाईड म्हणून प्रा. डाॅ. महाजन यांच्या सह्या होत्या. यानंतर आरआरसीने ऑगस्ट २०२१ मधील मान्यता ग्राह्य मानून संशोधन कार्य पुढे नेण्यासाठी डिसेंबर २०२१ मध्ये मला पत्र दिले. अशा प्रकारे संशोधन कार्य आरंभापूर्वीची प्रक्रिया रंजकपणे पूर्ण झाली. प्रत्यक्ष संशोधन कार्य डिसेंबर २०२१ मध्ये सुरु झाले हे लक्षात घेतले तर डिसेंबर २०२२, २०२३, २०२४ आणि डिसेंबर २०२५ अशा चार वर्षांत पीएच. डी. पूर्ण होऊन हातात पदवी प्रमाणपत्र आले.

(पुढील भाग – संशोधन कार्याचा वेगाने प्रारंभ )


Protected Content

Play sound