Home Agri Trends मी आणि माझे संशोधन : भाग १० – निष्कर्ष आणि सूचना...

मी आणि माझे संशोधन : भाग १० – निष्कर्ष आणि सूचना !


ख्यातनाम ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या अंतर्गत ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ : जळगाव जिल्हा) या विषयावर शोध प्रबंध सादर केला आहे. यातील सारांशाचा वाचा हा दहावा व शेवटचा भाग.

संशोधन कार्यात प्रश्नावली भरून घेतल्यानंतर आणि मुलाखती घेतल्यानंतर त्याचे वर्गीकरण चौकटी, आलेख, तथ्य -निष्कर्ष, स्पष्टीकरण अशा प्रकारातील लेखन फार सावधपणे करावे लागते. लेखनाच्या भाषेतील शब्दांचे महत्त्व आणि त्याच्याशी संबंधित संकल्पना लक्षात घ्याव्या लागतात. भाषा सर्वांना समजेल अशी वापरायची असली तरी तांत्रिक – विज्ञान विषयक संकल्पना – तथ्ये त्याच भाषेत मांडावी लागतात. ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ : जळगाव जिल्हा)’ या विषयावरील संशोधन कार्य अंतिम टप्प्यात पोहचले होते. प्रश्नावली व मुलाखतींमधून आलेल्या निष्कर्षांचे सविस्तरपणे लेखन केलेले होते. गाईड प्रा. डाॅ. सुधीर भटकर यांनी संशोधन प्रबंधाचे अंतिम प्रकरण ‘निष्कर्ष आणि सूचना’ नेमकेपणाने लिहा असे आवर्जून सांगितले.

मा. कुलगुरूंच्या हस्ते नोटीफिकेशन प्रदान

मी करीत असलेल्या संशोधन कार्याला जवळपास चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आलेला होता. त्यामुळे संशोधन विषयाशी संबंधित इतरही संकल्पना – उप विषय याची मलाही बऱ्यापैकी माहिती झालेली होती. संशोधन कार्य जसे – जसे अंतिम उद्दिष्टांपर्यंत पोहचत असते तसे – तसे त्या विषयातील काही सुधारणा, सूचना करण्याचा अधिकार संशोधकाला अनुभवातून प्राप्त होत जातो. माझ्या बाबतीत सुद्धा तसे अनुभवाला आले.

पदवीदान समारंभात सहभाग

केळी लागवड करणारा शेतकरी बहुमाध्यमातून केळी लागवडीच्या नवतंत्राची माहिती घेत असतो, त्या माहितीनुसार शेतकरी शेती करण्याच्या पद्धतीत बदल करतो, त्याचे केळी उत्पादन – उत्पन्न वाढते, वाढलेल्या उत्पन्नातून त्याच्या राहणीमानात व जीवशैलीत बदल घडतो, हा निष्कर्ष व त्या संबंधित काही तथ्ये सिद्ध झालेली होती. परंतु केळी उत्पादक शेतकऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करताना त्यांच्या काही अडचणी, सूचना, प्रश्न समोर आलेले होते. त्याचा संशोधन प्रबंधात उल्लेख करणे आवश्यक होते. निष्कर्ष आणि सूचना प्रकरणाचे लेखन करताना या अगोदर सविस्तरपणे लेखन केलेल्या सर्व प्रकरणांचा सारांश सुद्धा घ्यावा लागतो. तसे करणे म्हणजे, संशोधन कार्याचे सिंहावलोकन करणे असते.

पीएच. डी. पदवी

संशोधन कार्यातून जवळपास १३ प्रकारचे निष्कर्ष समोर आले. त्यात केळी उत्पादक शेतकरी सर्वाधिक इंटरनेट आधारित बहुमाध्यमे वापरतो, छापिल वृत्तपत्रे माध्यमातून शेती विषयक मजकूर कमी झाला, शेतीच्या नवतंत्राची माहिती बहुमाध्यमातून २४ तास गुणिले ७ दिवस मिळते, बहुमाध्यमातील माहिती समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांना भाषा, अक्षर, लिपी अशा अडचण येत नाहीत, नवतंत्र वापराची थेट माहिती मिळते, ती वापरून शेतकरी उत्पादन – उत्पन्न वाढवितात, त्यानंतर ते राहणीमान बदलतात असे ठळक निष्कर्ष होते. संपादक – पत्रकार यांच्याही मुलाखतीतून काही निष्कर्ष समोर आले.

हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन भाग १ : शिक्षण आणि नोकरीशी संबंधित अनुभवांचा प्रवास !

त्यात छापिल माध्यमे सुद्धा आता बहुमाध्यमे झाली आहेत, त्यांच्या इ आवृत्ती आहेत, टीव्ही चॅनेल आहेत, सोशल मीडियाचा पर्याय सुद्धा वृत्तपत्रे वापरतात, शेती विषयक मजकूर माध्यमे देतात, कृषी विषयक मजकुराचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे असे निष्कर्ष समोर आले. केळी लागवड करणारे तज्ज्ञ – अभ्यासक यांच्या मुलाखतीतून वेगवेगळे निष्कर्ष समोर आले. त्यात केळी लागवडीच्या नवतंत्राचा वापर आता ८० टक्के शेतकरी करू लागले आहेत. केळी लागवड क्षेत्रात ‘जेआयएसएल’ ने अमुलाग्र बदल करून शेतकऱ्यांचे राहणीमान बदलले आहे, पूर्वी केळी लागवड कालावधी २२ महिन्यांचा होता, तो आता १२ महिन्यांवर आलेला आहे, केळीचे नवतंत्र शेत शिवारात पोहचविण्यात बहुमाध्यमे उपयुक्त ठरली आहेत, केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनशैलीत संख्यात्मक – दृश्यात्मक बदल झालेला आहे, केळी उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक – सामाजिक – राजकिय पत – प्रतिष्ठा वाढलेली आहे असे निष्कर्ष समोर आले.

हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग २ – पीएच. डी. प्रवेशातील रंजकता

संशोधन प्रबंधाचे लेखन करताना िनश्चित केलेली उद्दिष्ट्ये आणि समोर आलेली तथ्ये याची तुलना करणे आवश्यक ठरते. त्यानुसार प्रस्तुत संशोधन कार्याच्या लेखनात तशी तुलना केलेली आहे. पहिले उद्दिष्ट होते, बहुमाध्यमांचे रुप, स्वरुप व प्रभाव अभ्यासणे. केळी उत्पादक, माध्यम प्रतिनिधी, शेती संशोधनाचे अभ्यासक यांच्या प्रश्नावली भरणे व मुलाखतीतून तथ्य समोर आले की, सर्वच बहुमाध्यमांचा वापर केळी उत्पादक शेतकरी करीत असतो. त्याद्वारे त्याला शेतीच्या नवतंत्राची माहिती मिळते. दुसरे उद्दिष्ट होते, कृषी नवतंत्रज्ञानाचे स्वरूप व उपयुक्तता तपासणे. या संदर्भात तथ्य समोर आले की, केळी लागवड करणारा शेतकरी सर्व प्रकारचे नवतंत्र वापरून केळीचे उत्पादन – उत्पन्न वाढवतो आहे. तिसरे उद्दिष्ट होते, कृषी विषयक माहितीचे विश्लेषण करणे.

हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ३ – संशोधन कार्याचा वेगाने प्रारंभ !

या संदर्भात तथ्य समोर आले की, केळीचे उत्पादन वाढविण्याच्या सोबतच शेतकरी केळी काढणी व वाहतूक या विषयांकडे लक्ष देत आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील केळीची परदेशात निर्यात – विक्री वाढण्याची शक्यता आहे. चौथे उद्दिष्ट होते की, शेतकऱ्यांचा नवतंत्र वापर विषयक दृष्टीकोन तपासणे. या संदर्भात तथ्य समोर आले की, शेतकरी केळी लागवडीच्या सर्व प्रकारच्या तंत्राची माहिती घेत असून त्याचा वापर वेळोवेळी करीत आहे. पाचवे उद्दिष्ट होते की, केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या राहणामानातील बदल अभ्यासणे. या संदर्भात तथ्य समोर आले की, केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांमधील राहणीमान व जीवशैलीत खूप बदल झालेला आहे.

हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ४ – संशोधन म्हणजे काय ?

उद्दिष्ट आणि समोर आलेल्या तथ्यांच्या तुलनेप्रमाणेच निश्चित केलेल्या तथ्यांची सुद्धा पडताळणी केली. त्यातून समोर आले की, केळी उत्पादक शेतकरी बहुमाध्यमांचा नेहमी वापर करतात, शेतकरी सर्व प्रकारची बहुमाध्यमे हाताळतात, बहुमाध्यमातून केळी उत्पादकांना शेतीच्या नवतंत्राची माहिती मिळते, मिळालेल्या नव – नव्या माहितीचा वापर शेतकरी शेतात करतात, केळी उत्पादकांचे केळी उत्पादन वाढल्यांतर त्यांचे उत्पन्न वाढले आहे, हातात जास्त पैसा आल्यामुळे त्यांनी राहणीमान व जीवनशैलीत बदल केले आहेत. उद्दिष्ट व तथ्यांची पडताळणी केल्यानंतर संशोधकाने त्याच्या सूचना व शिफारशी करणे आवश्यक असते. त्या सुद्धा प्रबंध लेखनाच्या अंतिम प्रकरणात केलेल्या आहेत.

हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ५ – संशोधन पद्धती निश्चित करणे !

जळगाव जिल्ह्यातील केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती घेताना व प्रश्नावली भरून घेताना त्यांनी कृषी क्षेत्रातील यंत्रणांकडून मदत व सहकार्याच्या अनेक सूचना केल्या. त्यातील काही महत्त्वाच्या सूचना अशा – १) कृषी क्षेत्रात रोज नव – नवे तंत्र विकसित होत आहे. शेतकऱ्यांना त्याची माहिती बहुमाध्यमातून मिळते आहे, मात्र नवतंत्र हे महागडे आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे नवतंत्राच्या किमतीवर नियंत्रण हवे. तशी व्यवस्था सरकारने अनुदान – मदत देऊ करावी, २) कृषी नवतंत्राचा प्रसार प्रात्यक्षिकांद्वारे करावा. कृषीचे कोणतेही नवतंत्र विकसित झाल्यानंतर त्याचा प्रचार – प्रसार हा प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून करायला हवा. ३) पारंपारिक माध्यमे जसे – वृत्तपत्रे, आकाशवाणी व टीव्ही यात कृषी विषयक आशय वाढविणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ६- बहुमाध्यमांच्या प्रभावाचा अभ्यास

वरील सूचनांच्या सोबतच संशोधकाने काही शिफारशी सूचविल्या आहेत. त्या अशा – १) कृषी पत्रकारिता अभ्यासक्रमात अमुलाग्र बदल हवा. पत्रकारितेत कृषी विषयक आशयाची परिपूर्ण मांडणी – प्रचार – प्रसार करण्यासाठी पत्रकारांना वेळीच प्रशिक्षण दिले जाणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे अभ्यासक्रम तयार करावा. २) कृषी क्षेत्रात चिन्हांकित सक्षारता प्रभावी पर्याय आहे. शेतातील कामे काही वेळा अशिक्षित कामगार – मजूर वर्ग करीत असतो. काही वेळा त्यांची भाषा वेगळी असते. अशा काम करणाऱ्यासांठी चिन्ह, चित्र, चित्रफित या प्रकारातील आशय उपयुक्त ठरतो.

हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ७ – शेतीचे नवतंत्रज्ञान आणि वापर

शेतीचे नवतंत्रज्ञान कसे वापरायचे ? हे पाहून तशी कृती करणे त्यांना शक्य होते. ३) सुरक्षित व संरक्षित शेतीचे माॅडेल हवे. शेतीच्या नवतंत्रात आता बंदिस्त शेती, नेट – शेटमधील शेती असे प्रकार विस्तारित होत आहेत. मात्र कोणतेही नवे वाण – बियाणे – रोपे यावरील संसर्गजन्य रोग, किटकांचा प्रादुर्भाव या विषयी शाश्वती नसते. हवामानाच्या लहरीपणाचाही फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे आजही कृषी क्षेत्रात सुरक्षित व संरक्षित शेतीचे माॅडेल तयार करण्याची संधी आहे. त्यासाठी कमी खर्चाचे व जास्त वापराचे नवतंत्र तयार करावे.

हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ८ – ‘जेआयएसएल’ आणि कृषी नवतंत्रज्ञान

वरीलप्रमाणे ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ : जळगाव जिल्हा)’ या विषयावरील संशोधन कार्य व त्याच्या विषयीचा संशोधन प्रबंध (८९० पाने) लेखनाचे कार्य पूर्ण झाले. याच विषयाच्या अधिक माहितीसाठी संशोधक तथा लेखक डाॅ. दिलीप तिवारी, जळगाव (महाराष्ट्र), मोबाईल क्रमांक 9552585088 वर संपर्क साधावा.

( समाप्त )

हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ९ – प्रश्नावली आणि मुलाखती


Previous articleवाळू डंपर सोडण्यासाठी लाच; तलाठी व मंडळ अधिकारी अटकेत
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound