यावल प्रतिनिधी | तालुक्यातील कासारखेडे येथे सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी विक्री होणाऱ्या दारूवर बंदी करावी या मागणीसाठी गावातील आदीवासी महिलांनी यावल येथील तहसीलदार महेश पवार व पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना निवेदन दिले आहे
“तालुक्यातील कासारखेडे गावात व परिसरात मागील अनेक दिवसापासून अवैध गावठी हातभट्टीच्या दारूचा सुळसुळाट झाला असून या दारुमुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. कमाविता कुटुबप्रमुख दारूच्या व्यसनामुळे मरण पावल्याने अनेकांचे कुटुंब उघडयावर पडत आहे. गावात सार्वजनिक ठिकाणी सहजरित्या मिळत असलेली गावठी दारू ही सतत पीत असल्याने पुरुष व तरूण यांचे मानसिक संतुलन बिघडत असून गेल्या काही दिवसात गावात दोन-तीन जणांच्या आत्महत्या केल्याचे प्रकार झाले आहेत, गावातील महीला त्या दारू विक्री करणाऱ्यांना गावात दारू विकू नये असे सांगायला गेल्यास दारू विकणारे हे गुंडगिरीची भाषा वापरून महीलांना धमकावतात.” असे महीलांचे म्हणणे आहे .
गावात ही दारूविक्री सतत सुरू राहिली तर भविष्यात अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही तरी गावातील अवैध दारू विक्री बंद करावी. अशा आशयाचे निवेदन कासारखेडे येथील आदीवासी महिलांनी तहसीलदार महेश पवार व पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांना दिले असून तहसीलदार महेश पवार यांनी तात्काळ फैजपूर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी यांच्याशी दुरध्वनीव्दारे सूचना देवुन अशा प्रकारे दारू विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करावी असे सांगीतले. या तक्रार निवेदनावर आशा नवाज तडवी, नजमा हमीद तडवी ,सायरा फत्तू तडवी, साबिराबाई तडवी, शानजान तडवी, जैनूर तडवी यांच्यासह अनेक महिलांच्या स्वाक्षरी आहेत.