दंगल घडविणार्‍या रजा अकादमीवर बंदी घाला : नितेश राणे

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील अनेक शहरांमध्ये काल झालेल्या हिंसाचाराच्या मागे रजा अकादमी असून या संघटनेवर बंदी घालावी अशी मागणी भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे.

राज्यातील अनेक शहरांमध्ये काल हिंसाचार झाला. यात प्रामुख्याने मालेगाव, अमरावती आणि नांदेड येथे जमावाने हिंसा केली. या हिंसाचारासाठी रजा अकादमी जबाबदार असून या संस्थेवर बंदी घाला, नाही तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू असा इशारा भाजपा नेते नितेश राणे यांनी दिलाय. राणे यांनी ट्विट करत हा इशारा दिला आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी सकाळी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की- महाराष्ट्राच्या विविध भागात जी हिंसा आणि दंगल उसळली त्याच्या पाठीमागे अतिरेकी संघटना रजा अकादमीच आहे. प्रत्येक वेळेस ते शांतता भंग करतात, सर्व नियम पायदळी तुडवतात आणि सरकार बसून राहतं, बघत बसतं. सरकारनं एक तर यांच्यावर बंदी घालावी अन्यथा, महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू….

रजा अकादमी ही अनेकदा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. विशेष करून आझाद मैदानावरील घटनेमुळे ही संघटना कुप्रसिध्द झाली होती. ११ ऑगस्ट २०१२ ची. आसाम आणि म्यानमारमध्ये झालेल्या मुस्लिमांवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ रजा अकादमीनं मुंबईतल्या आझाद मैदानावर धुडगूस घातला होता. आता याच संघटनेच्या विरूध्द नितेश राणे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत.

Protected Content