जळगाव प्रतिनिधी । बळीरामपेठेतील योगेश पवार यांच्या घरी १४ ऑगस्टच्या मध्यरात्री चोरी झाली होती. यावेळी पवार यांच्या घरात, अंगणात चिखलामुळे चोरट्याच्या चपलेचे ठसे उमटले होते. या ठशांवरुन शहर पोलिसांनी एका चोरट्याची ओळख पटवली. या चोरट्यास अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार अद्याप फरार आहे. विषेश म्हणजे अटक केलेल्या चाेरट्यास शहरातून हद्दपार केले आहे.
रिजवान उर्फ काल्या गयासुद्दीन शेख (वय २२, रा.तांबापुरा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. तर त्याचा साथीदार समीर (पुर्ण नाव माहित नाही) हा बेपत्ता आहे. समीर व काल्या या दोघांनी १४ ऑगस्टच्या मध्यरात्री बळीरामपेठेतील यागेश पवार यांच्या तीन मजली इमारतीच्या खालच्या खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
यावेळी पवार कुटंुबिय वरच्या मजल्यावर झोपलेले होते. चोरट्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर कपाटात ठेवलेले ५ ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, ५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा, दोन चांदीच्या मूर्त्या आणि ८ हजार रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला. दरम्यान, शहरात संततधार पाऊस पडत असल्यामुळे सर्वत्र चिखल झाला आहे. याच चिखलात माखलेल्या काल्याची चप्पलेचे ठसे पवार यांच्या घरात, अंगणात उमटले होते.
दुसऱ्या दिवशी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले. यावेळी अक्रम शेख, गणेश शिरसाळे यांनी मोबाईलमध्ये ठशांचे फोटो घेतले होते. दरम्यान सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे अक्रम शेख, गणेश शिरसाळे, सुधीर साळवे, योगेश इंधाटे, भास्कर ठाकरे यांच्या पथकाने सोमवारी संशय तसेच मिळालेल्या गुप्त माहितीवरुन काल्या याला ताब्यात घेतले. यानंतर त्याला चिखलातून चालायला लावून नंतर चपलेचे ठसे तपासले. पवार यांच्या घरात मिळुन आलेल्या ठशांशी ते तंतोतंत मिळत होते.
काल्या यानेच ही चोरी केल्याची खात्री होताच पोलिसांनी त्याला खाक्या दाखवला. यानंतर काल्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच सोबत समीर असल्याचेही सांगीतले. पवार यांच्या घरातून चोरीस गेलेला काही ऐवज काल्याकडून हस्तगत केला आहे. तर उर्वरीत ऐवज समीरच्या ताब्यात असल्याचे त्याने सांगीतले. शहर पोलिसांनी काल्याला अटक केली आहे. तर समीरचा शोध सुरू आहे.