वराडसीमची ऐतिहासीक परंपरा खंडित; पोळा यंदा पहिल्यांदाच रद्द

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील वराडसीम येथील ऐतिहासीक परंपरा असणारा पोळा यंदा पहिल्यांदाच रद्द करण्यात आला आहे.

पोळा हा सण शेतकर्‍यांसाठी वर्षातील सर्वात मोठा व महत्वाचा असतो. यात शेतकरी हे आपला विश्‍वासू साथीदार असणार्‍या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करत असतात. खान्देशातील प्रत्येक गावात पोळा साजरा करण्यात येतो. यात काही गावांमध्ये पोळ्याच्या दिवशी विविध प्रथा तयार झाल्या असून यात वराडसीम येथील पोळा हा अतिशय वैशिष्टयपूर्ण मानला जातो.

वराडसीम या गावात पुरातन असा गाव दरवाजा आहे. येथील रहिवासी नारायण राघो पाटील यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळे त्यांनीगावाचे संरक्षण व्हावे या हेतूने स्वखर्चाने भला मोठा गाव दरवाजा बसविला. गेल्या सुमारे तीन शतकांपासून हा दरवाजा अस्तित्वात आहे. वराडसीम गावातील अनेक पिढ्यांचे रक्षण करण्याचे काम या दरवाजाने केले आहे.

दरम्यान, हा गाव दरवाजा बसविल्यानंतर काही वर्षांनी वराडसीम गावात पोळ्याच्या दिवशी नवीन प्रथा जन्माला आली. जी आता परंपरा बनली आहे. यात पोळ्याच्या दिवशी हा दरवाजा बंद करून व खिडकी उघडून केवळ बैलपोळा फोडण्याची परंपरा सुरू करण्यात आली.

पोळ्याच्या दिवशी वराडसीम गावातून मानाच्या बैलाची गावभर मिरवणूक निघते. त्यालाच बाशिंग्या बैल म्हणतात. त्याच्या माथ्यावर शिंगांमध्ये मोठे बाशिंग बांधले जाते. त्याला अंगभर सजवले जाते. या बैलाचे ठिकठिकाणी पूजन करण्यात येते. यानंतर मुख्य कार्यक्रम सुरू होतो.

यात गाव दरवाजात असणार्‍या अडीच बाय तीन फुटाचा आकार असणार्‍या लहान दरवाजातून सुशोभीत केलेले बैल कुदविले जातात. बर्‍याच बैलांना येथून उडी मारणे शक्य होत नाही. मात्र ज्या शेतकर्‍याचा बैल हा येथून उडी मारतो त्याचा सन्मान करण्यात येतो.

गेल्या जवळपास दोन शतकांपासून ही परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. तथापि, यंदा कोरोनाच्या आपत्तीमुळे पहिल्यांदाच ही परंपरा खंडित होणार आहे. यामुळे वराडसीमचा पोळा हा यंदा अगदी सुन्या-सुन्या पध्दतीत साजरा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content