एकही झाड न तोडता बाळासाहेबांचे स्मारक उभारणार – महापौर

Ghodele Mayor aurangabad

औरंगाबाद, वृत्तसंस्था | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वृक्षतोडीला विरोध दर्शवत ‘आरे’तील मेट्रोशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. या निर्णयाबद्दल कौतूक होत असतानाच शहरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक हजार झाडे तोडणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोशल मीडियातून प्रश्न विचारण्यात येत होते. अखेर महापौर नंदकुमार घोडेले यांनी या प्रकरणावर खुलासा केला आहे. एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले जाणार आहे. प्रशासनाला तसे आदेश दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

मेट्रो कारशेडच्या उभारणीसाठी आरेतील झाडे तोडण्यात आली होती. याला शिवसेनेने विरोध केला होता. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वृक्षतोडीला विरोध दर्शवत ‘आरे’तील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. मात्र, या निर्णयाच्या काही दिवसानंतरच औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक हजार झाडे तोडणार असल्याची माहिती समोर आली. त्यावरून बराच गोंधळ सुरू झाला होता. अनेकांनी सोशल मीडियातून यावर प्रश्न उपस्थित केले होते.

यासंदर्भात महापौर घोडेले यांनी स्मारकाविषयीची महापालिकेची आणि प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. महापौर घोडेले म्हणाले, “औरंगाबाद शहरातील एमजीएम विद्यापीठाशेजारी प्रियदर्शनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होणार आहे. १७ एकर जागेवर हे स्मारक होणार आहे. त्यासाठी ६४ कोटींची निविदा प्रक्रिया विचाराधीन आहे. शासनाकडून पाच कोटी रूपये मिळाले आहेत. निधी उपलब्ध करून देण्याचे शासनाने आश्वासित केले आहे. हे स्मारक करण्यासाठी तत्कालीन सरकारने हे मंजूरी दिली होती. सध्या एक विषय चर्चेत आहेत. लावण्यात आलेली झाडे तोडून स्मारक बनवणार आहोत, असे बोलले जात आहे. महापौर म्हणून मी खुलासा करतो की, एकही झाड न तोडता स्मारक उभारण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. उद्धव ठाकरे यांनी जागेची पाहणी करताना झाडे न तोडता स्मारक व्हावे असे आदेश दिले होते. उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच आमचाही झाडे तोडण्याला विरोध आहे,” असेही घोडेले म्हणाले.

Protected Content