चैन्नई (वृत्तसंस्था) वेल्लोर लोकसभा मतदारसंघात मतदारांना पैशांचे आमिष दाखवण्याचे अनेक प्रकार घडल्याचे निदर्शनास आल्यामुळे येथे दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी होणारे मतदान निवडणूक आयोगाने रद्द केले आहे. या कारवाईसाठी निवडणूक आयोगाने केलेल्या शिफारशीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात एआयएडीएमकेचे सहयोगी आणि वेल्लोर मतदार संघाचे उमेदावर ए.सी. षण्मुगन यांनी बुधावारी मद्रास हायकोर्टात धाव घेतली आहे.
मोठ्या प्रमाणात अनधिकृत रोख रक्कम, अंमली पदार्थ, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोफत भेटवस्तूंचे आमिष येथील मतदारांना दाखविण्यात येत असल्याचा अहवाल निवडणूक आयोगाला प्राप्त झाला होता. आतापर्यंत जप्त केलेल्या २२५० कोटींच्या अनधिकृत रोख रक्कमेपैकी केवळ तामिळनाडूतून ४९४ कोटींची रोकड निवडणूक आयोगाने जप्त केली आहे.
दरम्यान, द्रमुक पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खजिनदार दुराईमुरुगन यांचे पुत्र कतीर आनंद यांना पक्षाने वेल्लोर लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली आहे. २९ मार्च रोजी कतीर यांच्या निवासस्थानी बेहिशेबी रोकड सापडली होती. त्यानंतर २९ आणि ३० मार्चच्या रात्री दुराईमुरुगन यांच्या मालकीच्या किंगस्टन कॉलेजमधून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सिमेंट गोदामात हलवण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर प्राप्तिकर विभागाने १ एप्रिल रोजी टाकलेल्या छाप्यात ११.५३ कोटींची बेहिशेबी रोख रक्कम या गोदामात आढळून आली होती. त्यानंतर प्राप्तिकर विभागाने दिलेल्या अहवालावरून १० एप्रिल रोजी जिल्हा पोलिसांनी कतीर आनंद तसेच द्रमुकच्या अन्य दोन नेत्यांविरोधात तक्रार दाखल केली होती.