बापाच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या मुलाला जामीन मंजूर

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील ओढरे येथे घरातील झालेल्या वादातून वडील व मुलाच्या झालेल्या झटापटीत दगडावर ढकलल्याने जखमी झालेल्या बापाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुलाला अटक करण्यात आली होती. आज जळगाव जिल्हा न्यायालयाने संशयित आरोपीचा जामीन मंजूर केला आहे. 

हकीकत अशी की, तालुक्यातील ओढरे येथील रहिवाशी गोकुळ भावसिंग जाधव याला दारू, गांजा व बिडीचे व्यसन लागले होते. त्यामुळे तो पत्नीकडे दारू पिण्यासाठी सतत पैसे मागत होतो. पैसे न मिळाल्यास पत्नी यमुनाबाई, मुलगा अमोल जाधव आणि मुलगी निकिता जाधव यांना मारहाण करत होता. त्यामुळे यमुनाबाई ह्या दोन्ही मुलांसह वडील सखाराम राठोड यांच्या शेतात झोपडी करून राहत होते. परंतू त्यांचे कपडे व इतर सामान नेले नव्हते. १० एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास निकिता आणि अमोल हे दोघे त्यांचा सामान घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले. त्यावेळी गोकुळ जाधव हे घरातच बसले होते. त्यावर मुलाला तू इथे का आलास ? त्यावर अमोलने सांगितले की कपडे व सामान घेण्यासाठी आलो आहे असे सांगितले.  तेव्हा गोकुळ जाधव याने त्याला शिवीगाळ केली व ईथे काहीही घ्यायला यायचे नाही, चल निघ इथून, असे बोलून अमोलला शिवीगाळ केली व त्याला मारहाण करायला सुरुवात केली. दोघांच्या झटापटीत अमोलने वडील गोकूळ जाधव यांना दगडावर ढकलून दिले. त्यात ते जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. चाळीगाव ग्रामीण पोलीसांनी अटक केली होती. 

सदरहू आरोपी अमोल जाधव याचेतर्फे जळगाव येथील ॲड. प्रसाद वसंत ढाके यांनी जळगाव सेशन्स कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाचे सुनावणीवेळी तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. धनंजय देशपांडे यांनी दोन्ही बाजूंच्या युक्तिवाद ऐकून आरोपी अमोल गोकुळ जाधव यास २५ हजाराच्या सशर्त जामिन मंजूर केला. आरोपी अमोल गोकुळ जाधवतर्फे जळगाव येथील ॲड. प्रसाद वसंत ढाके यांनी जामीनाचे काम पाहिले. सरकारतर्फे ॲड. भारती खडसे यांनी काम पाहिले.

 

Protected Content