पाचोरा- नंदु शेलकर | आज पहाटे कुशीनगर एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाच्या बॅगने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. मात्र तरूणाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
वेळ होती पहाटे ५:३० वाजेची लोकमान्य टिळक टर्मिनस येथुन गोरखपुर च्या दिशेने जाणारी कुशीनगर एक्सप्रेस मधील इंजिन पासुन तिसर्या क्रमांकाच्या जनरल बोगी मध्ये नांदगाव ते न्यायडोंगरी रेल्वे स्थानका दरम्यान एका प्रवाशी बॅग ने अचानक पेट घेतला. सदरचा प्रकार प्रवाशांच्या लक्षात येताच डब्ब्यात एकच खळबळ उडाली. डब्ब्याच्या वरच्या बर्थवर असलेली बॅग खाली फेकली असता खाली बसलेल्या अजय अशोक मगरे (वय – २३) या युवकाच्या बाजुला पडली असता अजय याने पायाने आग विझविण्याच्या प्रयत्न केला. यामुळे अजय याच्या पायास किरकोळ इजा झाली. दरम्यान प्रवाशांनी चैन पुलिंग करुन गाडी थांबवली असता अजय याने आग लागलेली बॅग गाडीतुन बाहेर फेकली. सुदैवाने पुढील होणारा मोठा अनर्थ टळला.
दि. १८ मार्च रोजी १२:३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथुन गाडी क्रं. २२५३८ ही गोरखपुरच्या दिशेने मार्गस्थ झाली. पहाटे ५ ते ५:३० वाजेच्या सुमारास एक्सप्रेस नांदगाव ते न्यायडोंगरी दरम्यान धावत असतांना एक्सप्रेसच्या इंजिन पासुन तिसर्या क्रमांकाच्या जनरल बोगी मध्ये वरच्या बर्थवर ठेवलेली प्रवाशी बॅग मधुन अचानक आवाज येवुन स्पार्किंग झाली. क्षणार्धात बॅगेने आग पकडली. बॅगेजवळ बसलेल्या एका इसमाने सदरची बॅग खाली फेकली व खाली बसलेल्या अजय अशोक मगरे याच्या अंगावर ती बॅग पडली. यामुळे अर्धवट निद्रेत असणारा अजय खळबळून जागा झाला. त्याने पायाच्या सहाय्याने आग विझविण्याच्या प्रयत्न केला असता त्याच्या पायाला किरकोळ इजा झाली. याच दरम्यान सह प्रवाशांनी चैन पुलिंग करुन गाडी थांबवली. व अजय याने सदरची बॅग गाडी बाहेर फेकल्याने पुढील अनर्थ टळला.
दरम्यान आर. पी. एफ. यांनी बोगी चेक करुन एक्सप्रेस पाचोर्याच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर एक्सप्रेस सकाळी ७:४५ वाजता पाचोरा रेल्वे स्थानकावर आल्यानंतर अजय मगरे यास रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात चाळीसगावचे ए. पी. आय. किसन राख यांनी अजय मगरे यांचेकडुन घटनाक्रम ऐकुन जबाब नोंदवला आहे.
बॅग मध्ये नेमके होते काय ?
नांदगाव ते न्यायडोंगरी रेल्वे स्थानका दरम्यान पेट घेतलेल्या बॅगेत नेमके होते तरी काय ? घटनास्थळी नाशिक येथील फॉरेंन्सिंक टीम दाखल झाली असुन बॅगेची सखोल चौकशी करत आहेत. ही आग नेमकी कशाने लागली ? याकडे चौकशीचा रोख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांची भेट
कुशीनगर एक्सप्रेस मध्ये प्रवाशी बॅगेने अचानक पेट घेतल्याने एका २३ वर्षीय युवकाच्या सतर्कतेने पुढील होणार मोठा अनर्थ टळला असुन जखमी युवकास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असुन अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन अजय मगरे याची चौकशी करुन घटनाक्रम जाणुन घेतला.
बॅग कोणाची हे अद्याप अस्पष्ट
दरम्यान, ज्या बॅगेने कुशीनगर एक्सप्रेस मध्ये अचानक पेट घेतला ती बॅग कोणाची होती ? याचा शोध घेणे हे रेल्वे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. नांदगाव ते न्यायडोंगरी दरम्यान चैन पुलिंग केल्यानंतर घटना स्थळावरुन बॅग मालकाने पलायन केले असावे ? असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.