बच्चू कडूंनी वाढविले महायुतीचे टेन्शन : शरद पवारांच्या भेटीकडे लक्ष !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर बच्चू कडू हे आज शरद पवार यांची भेट घेत असून यामुळे ते महाविकास आघाडीत सहभागी होणार का ? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

बच्चू कडू यांनी अनेकदा मंत्रीपद न मिळाल्याने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तर अनेकदा त्यांनी सरकारवरच टिका केली आहे. या पार्श्‍वभूमिवर आज ते शरद पवार यांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ते महाविकास आघाडीत जाणार का ? याबाबतच्या चर्चा आता जोर धरू लागल्या आहेत.

तर बच्चू कडू यांनी मात्र याबाबत आपली भूमिका जाहीर केली नाही. ते म्हणाले की, मदतीची जाणीव म्हणून आम्ही त्यांना फोन केला. आता इथून चाललेच आहेत तर घरी या असं आम्ही त्यांना सांगितलं. ते आमंत्रण त्यांनी स्वीकारले.तसेच सरकारवर टीका-टिप्पणी, नाराजी वगैरे सगळं करण्याची गरज नाही. आम्ही सध्या एकनाथ शिंदेंसोबत आहोत. जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाणार नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नसतील तर मग कदाचित आम्ही तसा निर्णय घेऊ, असे बच्चू कडू यांनी नमूद केले.

आमदार बच्चू कडू पुढे म्हणाले की, आमचा पक्ष आहे. पक्षाचं भलं कुठे होतंय, त्यानुसार विचार केला जाईल. जिथे राजकीय अस्तित्व मजबूत होईल, तो आमचा राजकीय सोबती असेल. आम्ही एक-दोन जागेसाठी काही करणार नाही. केलं तर तीन-चार जागा घेऊनच महाविका आघाडीकडे जाण्याचा विचार करू असेही त्यांनी स्पष्ट केले.

Protected Content