मुंबई । बोगस बियाण्यांवरून राज्यमंत्री बच्चू कडूंनी राज्य सरकारला घरचा अहेर देत राज्यातील कृषी खातं झोपलंय का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कृषी खात्याला टार्गेट करत आक्रमक भूमिका घेतली आहे. सोयाबीन पिकवणारा शेतकरी यंदा पूर्णपणे घायाळ करून टाकला आहे. पेरलं तेव्हा निघालं नाही आणि पीक हातात आलं तेव्हा मारून टाकलं. राज्यातलं कृषी खातं झोपलंय की काय अशी स्थिती आहे. जेव्हा बियाणांचं प्रमाणीकरण होतं, त्यावेळी काही बदमाशी होते का, असा प्रश्न मला पडतो. महाबीजनं बाजारातलं बियाणं घेतलं असा माझा स्पष्ट आरोप आहे. बाजारातून सर्वात निकृष्ट बियाणं २-३ हजार रुपये क्विंटल दरानं खरेदी करून ८ हजार रुपये क्विंटल दरानं विकल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
कृषी विभागाच्या कारभाराबद्दल बच्च कडूंनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी बियाणं तयार करणार्या कंपन्यांच्या मालकांना थेट इशारा दिला. ५० वर्षांत परिस्थिती जराही बदलेली नाही. बियाणं चांगलं मिळालं, असं एक वर्षही जात नाही. या प्रकरणात जो आरोपी आहे, कंपनीचा मालक आहे, त्याला धरून चोपलं पाहिजे. त्याच्याशिवाय यात सुधारणा होणार नसल्याचे बच्चू कडू म्हणाले.