जळगाव प्रतिनिधी । बाबासाहेबांच्या लिखाणातून सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन होते. हा देश सनातन असला तरी देशात खोलवर एकात्मता रुजलेली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत संघचालक मधुकरराव जाधव यांनी केले.
विद्यापीठातर्फे भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर व्याख्यानमालेंतर्गत जाधव हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संस्कृती या विषयावर बोलत होते. केशव स्मृती प्रतिष्ठान यांनी विद्यापीठाला दिलेल्या देणगीतून या व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर अध्यक्षस्थानी होते. केशव स्मृती प्रतिष्ठानच्या संचालक अनिता कांकरिया, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, सिनेट सदस्य मनीषा चौधरी, समतोलच्या सपना श्रीवास्तव उपस्थित होते.
याप्रसंगी जाधव म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांचा कालावधी लोटला तरी देखील मनातील अस्पृश्यतेची धार संपलेली नाही. ही अस्पृश्यता संपवून एकात्म समाज निर्मितीसाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, हा देश सनातन असला तरी देशात खोलवर एकात्मता रुजलेली आहे, अशी त्यांची धारणा होती. मनुस्मृतीत जे अमानवी सांगितले त्याला त्यांनी विरोध केला. अमानवी आणि अधर्म असा परंपराचा त्याग करा, असे त्यांनी सुचवले. याचा अर्थ त्यांनी धर्म सुधारणा सुचवल्या. त्यांनी हिंदूकोड बिल दिले. हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असे त्यांनी सांगितल्यानंतरही एकवीस वर्ष धर्म सुधारणेची वाट पाहिली. अध्यक्षीय समारोप प्रा. माहुलीकर यांनी केला. डॉ.सुनील पाटील यांनी सूत्रसंचालन केले.