बी. एड. महाविद्यालयात व्यक्तिमत्व शिबिर उत्साहात

 

चोपडा प्रतिनिधी । येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यपीठांतर्गत अभ्यासकेंद्रात व्यक्तिमत्व शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

याप्रसंगी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. शिबिराची सुरुवात संस्थेच्या माजी सचिव स्व.संध्याताई मयूर यांचे प्रतिमापूजन व सरस्वती पूजन संस्थेच्या सचिव माधुरी मयूर, संस्थेचे समन्वयक गोविंद गुजराथी, वक्ते अॅड. निर्मल देशमुख, प्राचार्या योगिता बोरसे, केंद्र संयोजक किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

सत्र पहिले
व्यक्तिमत्व शिबिराचे प्रथम पुष्प गुंफताना चोपड्यातील नामांकित विधीज्ञ अॅड. निर्मल देशमुख आपल्या मार्गदर्शनात “महिला सुरक्षा, समस्या व उपाय” या विषयावर मार्गदर्शन करताना महिलांवर होणारे अत्याचार का होतात तसेच हे थांबवण्यासाठी काय केले पाहिजे, स्व संरक्षण कसे केले पाहिजे, कायदा महिलासाठी कसा आहे, विविध प्रकारचे कलम काय मदत करू शकतात. यासंदर्भात माहिती दिली.

सत्र दुसरे
दुसरे पुष्प गुंफण्यासाठी महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक संजय बारी यांनी “चौकटीबाहेरचे जग” या विषयावर मार्गदर्शन करताना आपल्याजवळ असलेल्या गोष्टी ओळखा उगाच अनोळखी गोष्टीमागे पळू नका, समोर येणाऱ्या आव्हानांना संधी म्हणून पहा, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तरच पुढचे इप्सित साध्य होईल असे सांगितले.

सत्र तिसरे
तिसरे पुष्प पीव्हीएम इंग्लिश मिडियमचे प्राचार्य रजीष बी. यांनी जिद्द, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यशस्वी व्हा, आलेल्या संधीचे सोने करा, नेहमी आशावादी राहा, इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, प्रत्येक काम उत्साहाने व आत्मविश्वासाने करा, असा सल्ला दिला.

सत्र चौथे
चतुर्थ पुष्प गुंफताना अमळनेर येथील विज्ञान शिक्षक अश्विन पाटील यांनी पक्षी पर्यावरणाचा समतोल कसा ठेवतात ते उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट केले. पक्षांच्या विविध जाती, प्रजाती, विविध प्रकार यासंदर्भात माहिती दिली. पर्यावरण संवर्धन कसे करावे, शिक्षकांनी आपल्या आचरणातून पर्यावरण संरक्षण, संवर्धन कसे करावे ते सांगितले.

कार्यक्रमांवेळी परिचय व परिश्रम
यावेळी पाहुण्यांचा परिचय अभ्यासकेंद्राचे समंत्रक अनुक्रमे, प्रा.मनोहर मराठे, प्रा.संजय देशमुख, प्रा.मीनल पाटील, प्रा.स्वाती गुजराथी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, अभ्यासकेंद्राचे सहाय्यक महेंद्र पटेल यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रा.रुपेश नेवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक विसावे, जितेंद्र पाटील यांच्यासोबत प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content