मानवी हक्काची जाणीव शेवटच्या घटकापर्यंत असणे आवश्यक – जिल्हाधिकारी

जळगाव प्रतिनिधी । मुलभूत अधिकारापासून कोणीही नागरिक वंचीत राहू नये, यासाठी 10 डिसेंबर, 1948 रोजी मानवी हक्क आयोगाची स्थापना करून त्या दिवसापासून 10 डिसेंबर हा दिवस ‘मानवी हक्क दिन’ म्हणून साजरा करण्यात येत असतो. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मानवी हक्काची जाणीव असणे आवश्यक असून प्रत्येक नागरिकाला हक्क प्रदान करीत असताना प्रत्येकाने कर्तव्याचीही जाण ठेवणे आवश्यक आहे. प्रशासनातील सर्व  घटकांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मानवी हक्काचे महत्व पटवून देतानाच कर्तव्याचेही महत्व सांगावे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

मानवी हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी श्री. राऊत  पुढे म्हणाले की, जेव्हा नागरिक आपल्याकडे काही काम घेवून येतात तेव्हा त्यांना आपले काम विनाविलंब व्हावे, अशी अपेक्षा असते. तेव्हा आपणही तितक्याच तत्परतेने न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. शक्यतो नागरिकांना प्रत्येक कामासाठी जिल्हास्तरावर येण्याची आवश्यकता भासणार नाही याची काळजी घेत त्यांच्या  कामांचा  गाव पातळीवरच निपटारा केल्यास त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याचे समाधान मिळून मानवी हक्काचा लाभ दिला असे म्हणता येईल, असेही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यावेळी सांगितले. कोरोनाच्या काळात कोरोना बाधित आणि संबंधित यंत्रणांना प्रशासनाकडून मानवी हक्काचा लाभ देण्यात आल्याने बाधितांना औषधोपचाराबरोबच माणूसकीचेही दर्शन लाभले भविष्यातही या सर्वांना मानवी दृष्टीकोनातून मानवी हक्क मिळवून देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व संबंधितांना केले

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा सरकारी वकील ॲड.केतन ढाके, जिल्हा विधी सेवा सचिव ॲड. के. एच. ठोंबरे, ॲङ दिलीप बोरसे, तहसिलदार सुरेश थोरात, महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, पेट्रेस गायकवाड यांचेसह पोलीस, शिक्षण व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हा विधी सेवा सचिव ॲड. के. एच. ठोंबरे यांनी मानवी हक्क दिनानिमित्त मानवी हक्क आणि कर्तव्याची व्याप्ती आणि अधिकार क्षेत्र याबाबत सविस्तर माहिती विशद केली. प्रास्ताविकात सामान्य शाखेचे तहसिलदार सुरेश थोरात यांनी मानवी हक्क आयोगाची स्थापना, उद्देश आणि कार्यक्षेत्र याबाबत आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केले.

 

Protected Content