जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागाच्या वतीने डॉ. केतकी पाटील सेमिनार हॉल येथे लैंगिक समानता आणि लोकसंख्या वाढीचा संसाधनांवर होणारा परिणाम या महत्त्वाच्या विषयांवर पॉडकास्टच्या माध्यमातून सखोल चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमात गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती दर्शवली, तर गोदावरी नर्सिंगच्या प्रा. दिवायना पवार यांनी निवेदिका म्हणून सूत्रसंचालन केले. डॉ. वारके यांनी लैंगिक समानतेचे महत्त्व, समाजात असलेल्या असमतोलाचे दुष्परिणाम आणि वाढत्या लोकसंख्येमुळे जागतिक संसाधनांवर येणारा ताण यावर अभ्यासपूर्ण आणि महत्त्वपूर्ण चर्चा घडवून आणली.

या पॉडकास्टच्या माध्यमातून बौद्धिकता, सामाजिक जाणीव आणि परिवर्तनाची प्रेरणा यांचे एक अनोखे मिश्रण दिसून आले. विद्यार्थी आणि शिक्षकांनी या चर्चेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि सामाजिक समतेसाठी कार्य करण्याची प्रेरणा घेतली. डॉ. वारके यांच्या दमदार निवेदनामुळे आणि त्यांनी दिलेल्या सडेतोड उत्तरांमुळे अनेक प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न या पॉडकास्टमधून यशस्वीपणे करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लैंगिक समानता आणि लोकसंख्या वाढीच्या परिणामांबद्दल जागरूकता वाढण्यास मदत झाली.



