तहसील कार्यालयाकडून श्रावण बाळ योजनेसाठी टाळाटाळ

अमळनेर प्रतिनिधी ।  श्रावण बाळ योजनेसाठी दोन वर्षांपासून अर्ज करूनही ७० वर्षीय वृद्धाला तहसील कार्यालयातील कर्माचाऱ्यांकडून लाभ देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.                    

अमळनेर तालुक्यातील दहिवद येथील नाना रुपचंद सोनार (वय ७०)  यांनी २८ जून १८ रोजी श्रावण बाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज केला होता. त्यांना त्यांतर ३ डिसेंबर १९ रोजी म्हणजे तब्बल दीड वर्षांनंतर त्यांना प्रकरणात बँकेचे पासबुकची झेरॉक्स नसल्याची त्रुटी सांगण्यात आली. ही त्रुटी पूर्ण करूनही लाभ मिळाला नाही,.

दरम्यान सोनार यांनी लाभ मिळण्याची वाट पाहिली. पंरतु त्यांना लाभ मिळला नाही. त्यामुळे ते पुन्हा ११ महिन्यांनी संजय गांधी शाखेत गेले असता त्यांना सेतू कार्यालयात जा असे सांगण्यात आले. तेथे गेल्यानंतर सेतू कार्यालयात सांगण्यात आले की तुमचे प्रकरण संजय गांधी शाखेत गेले आहे. परत आल्यानंतर त्यांना सांगण्यात आले की तुम्ही तहसीलदारांना भेटा. यामूळे सोनार पूर्णपणे वैतागले आहेत.

नाना सोनार यांनी आपली व्यथा लालबावटा शेतमजूर युनियनचे कॉ. अमृत महाजन यांना सांगितली. त्यांच्यासह लक्ष्मण शिंदे, ज्ञानेश्वर पाटील, निर्मला शिंदे, प्रकाश लांबोळे, बापू भिल, किशोर भिल, चंद्रकांत माळी यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार मिलिंद वाघ यांना मेल करून तक्रार केली आहे. संजय गांधी योजना कार्यालयात वयोवृद्ध ,निराधार, दिव्यांग यांना फिरवाफिरव केली जाते. उलट सुलट उत्तरे दिली जातात. त्यामुळे वृद्धांची परवड थांबवावी आणि हेतुपुरस्कार त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे

शासनाच्या लाभार्थी योजना निराधार व वृद्धांना जगण्याला आधार देण्यासाठी आहेत, मात्र एवढा विलंब लागून त्यांना फेऱ्या मारायला लावल्या, तर जिवंतपणी त्यांना लाभ मिळतील की नाही, याची शंका वाटते. त्यामुळे त्यांचे हलपाटे थांबवण्यात यावे. तसेच संजय गांधी कार्यालयाजवळ दलाल फिरतात. त्यांना आवर घालण्यात यावा अशी मागणी अमृत महाजन यांनी केली आहे.

 

Protected Content