लाचप्रकरणी एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक कारागृहात

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी ३० हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप अशोक हजारे यांची जिल्हा न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत कारागृहात रवानगी केली आहे.

रायपुर, ता. जळगाव येथे दीड महिन्यापूर्वी दोन गटात वाद झाला होता. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन मारहाण, दंगल व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास सहायक निरीक्षक संदीप हजारे यांच्याकडे होता. याप्रकरणात मदत करण्यासाठी हजारे यांनी संबंधित व्यक्तीकडे ३० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. याबाबत तरुणाने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी पोलीस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, किरण रासकर, हवालदार सचिन गोसावी, मनोज पाटील, किरण अहिरराव व जाधव यांच्या पथकाने शनिवारी जळगाव गाठून तक्रारदार व हजारे यांची चौकशी केली. तांत्रिक पुरावे उपलब्ध झाल्याने हजारे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई केली. रविवारी सकाळी अटकेतील संदीप हजारे यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत कारागृहात रवानगी केली.

Protected Content