जळगाव प्रतिनिधी । संशोधक विद्यार्थ्यांना आविष्कार संशोधन स्पर्धेच्या माध्यमातून स्वत:ला सिध्द करण्याची उत्तम संधी आहे. या संधीचा फायदा त्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन युनायटेड फॉस्फोरस लि. कंपनीच्या संशोधन व विकास विभागाचे महाव्यवस्थापक प्रकाश जाधव यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेला बुधवार, ८ जानेवारी रोजी प्रारंभ झाला. या स्पर्धेचे उदघाटन करतांना प्रकाश जाधव बोलत होते. प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, स्पर्धेचे समन्वयक, प्रा.एस.आर.चौधरी, उपसमन्वयक, प्रा.ए.जी.इंगळे उपस्थित होते.
प्रकाश जाधव म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कल्पकता, सर्जनशीलता, रचानात्मकता आणि प्रायोगिकता ह्या गुणांचा अवलंब करुन उत्तमोत्तम संशोधन सादरीकरण करावे. आविष्कार म्हणजे पेंटेट कडे जाण्यासाठीचे एक पाऊल आहे. अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरु प्रा.माहूलीकर यांनी अविष्कार ही संशोधन स्पर्धा नसून तो उत्सव आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने संशोधन प्रकल्प सादर करावेत असे प्रतिपादन केले. प्रारंभी अविष्कारचे समन्वयक प्रा.एस.आर.चौधरी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धा आयोजित करणाऱ्या महाविद्यालयांच्या प्रतिनिधीचां सत्कार करण्यात आला. त्यामध्ये प्राचार्य एल.पी.देशमुख, प्रा.एस.ए.गायकवाड, डॉ. सुदाम चव्हाण, डॉ.एस.आर.गोसावी, प्रा. संजय शर्मा, प्रा.अजय सुरवाडे यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.उस्मानी यांनी केले. उपसमन्वयक, प्रा.ए.जी.इंगळे यांनी आभार मानले.
पोस्टर व मॉडेल प्रदर्शनाचे उद्घाटन
दीक्षांत सभागृहात बंगळुरु येथील नॅक कार्यकारी पदिषदेचे सदस्य, शास्त्रज्ञ बी.बी.इदगे यांनी पोस्टर व मॉडेल प्रदर्शनाचे फित कापून उदघाटन केले. नाविण्यपूर्ण विषयांची हाताळणी- पदवी, पदव्युत्तर, पदव्युत्तर पदवी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अशा गटात झालेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पोस्टरद्वारे जैवविविधता, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शेतकरी आत्महत्या, रस्ते सुरक्षितात, बांधकाम, ह्रदय विकार, उच्च शिक्षण, प्राथमिक शिक्षणाचे व्यवस्थापन, भारतीय अर्थव्यवस्था, शेतकरी कर्ज माफी व्यवस्थापन, कृषी विकास, कॅन्सर, ब्रेन ट्युमर, जाहीरातीचे साधणे आणि ग्रामीण समस्या, मोत्याची शेती, नारळाच्या कवटीपासून तेल,वृक्ष संवर्धन, योगासन आणि ताणतणाव, जागतिक मानव विकास, नैसर्गिक पाणी शुध्दीकरण, मानव अधिकार आणि राजकारण, सामाजिक माध्यमे, सांकेतिक भाषा, बोलींचा अभ्यास, बचत गट, आर्थिक मंदी, सुरक्षा काठी, पाण्याचे व्यवस्थापन आणि उपाय, जिवन कौशल्ये, काश्मिर प्रश्न आणि अंतर्गत सुरक्षा, आदिवासी शैक्षणिक समस्या, बालकांच्या मानसिक आरोग्य, जनप्रतिनिधींच्या कार्याचे मूल्यमापन, स्मार्ट व्हिलेज, मोबाईलचे मानसिक परिणाम, गोमुत्र, इको फ्रेंडली रोड, नैसर्गिक रुम फ्रेशनर तर मॉडेलद्वारे महिला सुरक्षेसाठी खास बुट, लॉकर सुरक्षा उपकरण, ओल्या-सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन, रस्ते अपघात टाळण्यासाठी विशेष गतीरोधक, घरगुती रुम हिटर, कचरा व्यवस्थापन, पुर व्यवस्थापनासाठी विशेष भिंती, हवे पासून पेयजल निर्मिती, कनेक्टीव्हीटी वॉटर निर्मिती, माती विरहीत शेती, मच्छर सापळा, मुकव्यक्तींसाठी संवाद यंत्र, जैविक तंत्रज्ञानातून किटक व्यवस्थापन, पर्यावरण संतुलीत इमारत आदी विषयांवर अत्यंत नाविण्यपूर्ण संशोधन सादर केले. ४६ मॉड्युल्स व ३७६ पोस्टरचे सादरीकरण १२७९ संशोधक विद्यार्थ्यांनी केले. या सादरीकरणाचे परीक्षकांनी मूल्यमापन केले. उद्या सकाळी यातून निवडलेल्या पोस्टरचे तोंडी सादरीकरण होईल. सांयकाळी पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.