‘सेक्युलर’मध्ये औरंगजेब बसत नाही : मुख्यमंत्री

मुंबई । संभाजीनगर असा ट्विटर हँडलमध्ये उल्लेख केला तर त्यात नवीन काय आहे? असा सवाल करतानाच औरंगजेब हा सेक्युलर नव्हता. आघाडीच्या अजेंड्यात सेक्युलर हा शब्द असून त्यात औरंगजेब बसत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला फटकारले आहे. 

वसंत गीते आणि सुनील बागुल या नाशिकमधील नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज संध्याकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या दोन्ही नेत्यांनी हाती शिवबंधन बांधले. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तुमच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? असा सवाल मुख्यमंत्र्यांना प्रसारमाध्यमांनी केला. त्यावर त्यात नवीन काय केलं? जे वर्षानुवर्षे बोलतोय, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो उल्लेख केला, तेच ट्विटरवर लिहिलंय, असं सांगतानाच औरंगजेब काही सेक्युलर नव्हता. आमच्या अजेंड्यात सेक्युलर शब्द आहे. त्यात औरंगजेब बसत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

गीते आणि बागुल यांच्या पक्षप्रवेशावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ही सर्व मंडळी आमचीच आहेत. तेव्हाही होती आणि आताही आहे. मधल्या काळात त्यांनी वेगळा मार्ग पत्करला होता. आता अनुभव समृद्ध करून ते शिवसेनेत आले आहेत, असं सांगतानाच नाशिक महापालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मधल्या काळात फाटाफूट झाली होती. पण आता पूर्वीपेक्षा अधिक ताकदीनं आम्ही नाशिक पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवूच, असं ठाकरे म्हणाले.

 

Protected Content