औरंगाबाद, वृत्तसंस्था | येथील जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कारण, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला तर उपाध्यक्षपद भाजपाला मिळाले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदी समसमान मते पडल्याने चिठ्ठ्या टाकून काढण्यात आलेल्या निकालात महाविकास आघाडीच्या मीनाताई शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली. उपाध्यक्षपदी एल.जी. गायकवाड यांनी बाजी मारली. शिवसेनेच्या शुभांगी काजवे यांना मात्र पराभवला सामोरे जावे लागले.
अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या मीनाताई शेळके व भाजपाच्या उमेदवार देवयानी डोणगावकर यांना ३०-३० अशी समान मते पडली होती. यानंतर चिठ्ठी काढण्यात आल्यावर काँग्रेसच्या मीनाताई शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली तर उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अशीच स्थिती अपेक्षित होती, मात्र
महाविकासाघाडीची दोन मते फुटली त्यामुळे भाजपाला ३२ व शिवसेनेच्या उमेदवाराला २८ मते मिळाली. यामुळे शिवसेनेला धक्का देत भाजपाचा उपाध्यक्ष झाला.
औरंगाबाद जिल्हा परिषदेत सर्वाधिक २३ सदस्य भाजपकडे आहेत. शिवसेना-१८, काँग्रेस-१६, राष्ट्रवादी- ०३, मनसे ०१, डेमोक्राटीक ०१ असे पक्षीय बलाबल आहे. मागीलवेळी शिवसेनेने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसची मदत घेत अध्यक्षपद मिळवले होते.