मुक्ताईनगर प्रतिनिधी । एकीकडे एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीतील संभाव्य प्रवेशाबाबत चर्वण सुरू असतांना आता सोशल मीडियात व्हायरल झालेल्या एका क्लीपमध्ये ते लवकरच पक्षांतर करणार असल्याचे संकेत मिळाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. स्वत: खडसेंनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले असले तरी याबाबत एकच चर्चा रंगली आहे.
रोशन भंगाळे या एका कार्यकर्त्याने एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधून पक्ष सोडण्याविषयी चर्चा केली. या चर्चेची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
या कथित क्लिपमध्ये खालील संवाद झाल्याचे ऐकू येत आहे.
रोशन भंगाळे : भाऊ आता राष्ट्रीय कार्यकारणीतही डावलण्यात आल्याने पक्ष सोडा व योग्य निर्णय घ्या.
एकनाथ खडसे : हो निर्णय घ्यायचा आहे. दुसरीकडे काय पद मिळते, ते तर बघू दे. दुसरीकडे जाऊन का नुसतेच बसायचे, काही तरी पद मिळाले पाहिजे की नाही, असे सांगत महिनाभरात निर्णय घेऊ.
आज दुपारी ही क्लीप सोशल मीडियात व्हायरल झाली. गेल्या अनेक दिवसांपासून नाथाभाऊ हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसची यासाठी स्वतंत्र बैठकदेखील झाली आहे. यामुळे खडसे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे मानले जात आहे. यातच ही क्लीप समोर आल्याने नव्याने चर्वण सुरू झाले आहे.
तर दुसरीकडे खडसेंनी या क्लीपबाबत इन्कार केला आहे. ते म्हणाले की,तो कॉल चुकीचा आहे. अशा बाबी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. दिवसभर शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अनेक कॉल येतात, भाऊ भूमिका घ्या, असा आग्रह धरतात. अर्थात, यामुळे पुन्हा एकदा संशयकल्लोळ निर्माण झाला हे सांगणे नकोच !