धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ शिवसेना युवासेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला माल्यार्पण करून झाली. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्यक्ष सदस्य नोंदणी फॉर्म भरून अर्जदारांकडून फॉर्म घेत नोंदणी केली.
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “शिवसेना युवासेना आणि महिला आघाडी सदस्य नोंदणी मोहीम राज्यभर राबवण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यात २५,००० सदस्य नोंदवण्याचे आणि जळगाव जिल्ह्यात साडेतीन लाख सदस्य नोंदणीचे लक्ष ठेवले आहे. विधानसभा क्षेत्रात ५०,००० सदस्य नोंदवण्याचा उद्देश आहे.”
त्यांनी यावेळी विरोधकांवरही जोरदार टीका केली. “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने विरोधकांना जागा दाखवून दिली आहे. आज सरकार आमचं आहे, मी मंत्री आहे, मी आमदार आहे. जे आम्हावर टीका करतात, त्यांच्या पक्षाकडे उमेदवारही नव्हता. त्यांनी आधी उमेदवार तयार करावा, पाच वर्ष मेहनत घ्यावी आणि मग निवडणूक लढवावी,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. कार्यक्रमात शिवकार्य सदस्य नोंदणीचे पत्रक पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यानंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री पाटील यांनी धरणगावातील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे रखडलेले काम लवकरच मार्गी लागणार असल्याचे आश्वासन दिले. “या संदर्भात योग्य पातळीवर हालचाली सुरू आहेत. नागरिकांना लवकरच याचा लाभ मिळेल,” असे ते म्हणाले. या उपक्रमामुळे शहरात शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीकरणास चालना मिळणार असून युवासेनेचा पुढील विस्तार अधिक वेगाने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.