Home क्राईम जळगावात बंद दुकानात चोरीचा प्रयत्न ; महिलांचा संशयास्पद वावर, एक महिला पोलिसांच्या...

जळगावात बंद दुकानात चोरीचा प्रयत्न ; महिलांचा संशयास्पद वावर, एक महिला पोलिसांच्या ताब्यात

0
4


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील स्मशानभूमीसमोरील नाल्यालगत असलेल्या न्यू अरुण ऑटो जनरेटर दुरुस्तीच्या दुकानात रविवारी सकाळी चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. दुकान बंद असल्याचा फायदा घेत काही महिलांनी दुकान परिसरात संशयास्पद हालचाली केल्याचे निदर्शनास आले. यावेळी दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याशी छेडछाड करून तो तोडण्याचा प्रयत्न झाल्याचेही सांगण्यात आले.

दुकान मालक पंकज कस्तुरे यांच्या लक्षात मोबाईलवर दुकानाबाहेरील काही महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्याजवळ संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे आले. त्यांनी तत्काळ परिस्थितीची माहिती घेत दुकानाकडे धाव घेतली. त्याचवेळी त्यांनी मित्र विवेक जगताप यांनाही घटनेची माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पंकज कस्तुरे यांनी येताना पोलिसांच्या ११२ क्रमांकावर फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांची हालचाल आणि परिसरात झालेली गर्दी पाहून तीन ते चार महिला तेथून पसार झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यातील एक महिला घटनास्थळी पोलिसांच्या हाती लागली.

दुकान मालक पंकज कस्तुरे यांनी संबंधित महिलेला एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. या दुकानात यापूर्वीही चोरी झाल्याचे दुकान मालकांनी सांगितले. त्यामुळे दुकानातील महागड्या वस्तू तसेच कॉपर वायर चोरीला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन ते दुकानाच्या परिसरावर लक्ष ठेवून होते. याच दरम्यान महिलांचा संशयास्पद वावर त्यांच्या निदर्शनास आला.

घटनास्थळी पाहणी केली असता काही महिलांनी कचरा वेचण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या पिशव्या सोबत आणल्याचेही दिसून आल्याचे सांगण्यात आले. दुकानासमोरच महापालिकेचा कचरा डेपो असल्याने या पिशव्या सोबत आणण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या सर्व बाबींची सत्यता पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे. दुकानात कॉपर वायर तसेच इतर महागड्या वस्तू असल्याने यापूर्वीही चोरीच्या घटना घडल्याचे मालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या परिसरात सुरक्षा वाढविण्याची गरज निर्माण झाली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाल्याने दुकानमालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून ताब्यात घेतलेल्या महिलेची चौकशी सुरू केली आहे. पसार झालेल्या इतर महिलांचा शोध तसेच चोरीच्या प्रयत्नामागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत. जळगावातील न्यू अरुण ऑटो जनरेटर दुकानात रविवारी बंदचा फायदा घेत चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्याशी छेडछाड केल्याचा प्रकारही घडला. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून एका महिलेला ताब्यात घेतल्याने पुढील चोरीचा प्रकार टळल्याचे सांगण्यात येत आहे.


Protected Content

Play sound