जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रायसोनी नगरात सोमवारी २३ सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास चोरट्यांच्या टोळीने तीन घरांमध्ये चोरीचा प्रयत्न केला. दोन ठिकाणी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले तर एका मेडीकल दुकानाचे कुलूप तोडतांना आवाज झाल्याने चोरटे तेथून पसार झाले. हा संपुर्ण प्रकार त्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरात असलेल्या रायसोनी नगरात सोमवारी २३ सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजता चोरट्यांच्या टोळीने तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. यामध्ये सुरुवातीला चोरट्यांनी एका बंद घराच्या सेफटी लॉक असलेल्या लोखंडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडला. मात्र चोरट्यांकडून त्या घराचा मुख्य दरवाजा न उघडल्यामुळे चोरटे तेथून पसार झाले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा एका अपार्टमेंटमधील बंद घराकडे वळवला. यावेळी त्या अपार्टमेंटमधील मेडीकल स्टोअरच्या दुकानाचे कुलूप तोडत होते. मात्र आवाज झाल्याने चोरटे तेथून देखील पळाले. त्यानंतर चोरट्यांनी त्याच परिसरातील एका बंद असलेल्या घराच्या दिशेने निघाले. त्यांनी त्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. परंतु त्या घरात कोणीच राहत नसल्याने चोरट्यांनी त्याठिकाणाहून देखील रिकाम्या हाती परतावे लागले.
चोरी करण्यासाठी आलेले चोरटे हे त्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यामध्ये दोन चोरट्यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले असून ते धष्टपुष्ट आहेत. तसेच त्यांनी चेहरा देखील काळ्या रंगाच्या मास्कने झाकलेला असून त्यांच्या हातात लोखंडी कटर सारखे हत्यार असल्याचे सीसीटीव्हीत कैद झालेल्या फुटेजमध्ये दिसून येत आहे. एकाच परिसरात तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला, परंतु चोरट्यांना तेथून रिकाम्या हाती परतावे लागले. हा प्रकार सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. तसेच पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी देखील परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.