जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात चार तरुण आणि तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. शनिवारी (दि. 21) मराठीच्या पेपरमध्ये कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
अशी होती कॉपीपेस्टची योजना
शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालय व ज्युनियर कॉलेज जळगाव येथे दहावीच्या परीक्षेचे केंद्र आहे. २१ फेब्रुवारी रोजी मराठी भाषेचा पेपर होता. पेपर सुरु असताना शाळेच्या इमारतीच्या मागील बाजूकडील शौचालयाच्या जवळ काहीजण संशयास्पद हालचाली करताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती केली असता त्यांच्या खिशात A4 साईजचे कागद मिळाले. त्यावर दोन्ही बाजूंनी हस्तलिखित आणि टंकलिखित मजकूर होता. त्यांनी चौकशीत सांगितले की, हे दहावीच्या मराठी पेपरची प्रश्नोत्तरे आहेत आणि ते परीक्षेत कॉपी करण्यासाठी त्यांच्या भावांना देण्यास आले होते.
अन् कॉपीपेस्टचा भांडाफोड
या मुलांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल रवींद्र कोळी (वय अंदाजे 30 वर्षे, रा. नशिराबाद) याने मराठी भाषेच्या पेपरची प्रश्नोत्तरे उपलब्ध करून दिली होती. दिगेंद्र भरतसिंग पाटील (वय 18 वर्षे, रा. मन्यारखेडा) याने ती प्रश्नोत्तरे त्याच्या अल्पवयीन मित्रांमार्फत सागर नारायण बारी (वय 23 वर्षे, रा. श्रीकृष्णनगर, जळगाव) याच्याकडे पाठवली. सागर बारी हा गुरुकुल कॉम्प्युटर्समध्ये काम करतो. त्याने त्या प्रश्नोत्तरांची पीडीएफ फाईल तयार केली आणि ती दिगेंद्र पाटीलला पाठवली. दिगेंद्रने ती फाईल अल्पवयीन मुलांना दिली. त्यांनी किरण नंदलाल परदेशी (वय 28 वर्षे, रा. ढाकेवाडी) यांच्या मोबाईलच्या दुकानातून प्रिंटआउट काढल्या.
सात जणांवर गुन्हा दाखल
पोलिसांनी दिगेंद्र भरतसिंग पाटील, सागर नारायण बारी, राहुल रवींद्र कोळी, किरण नंदलाल परदेशी आणि तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राहुल कोळी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या टोळीला प्रश्नोत्तरे कशी मिळाली, याचा तपास सुरू आहे. पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुबारक तडवी करत आहेत.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर, पोलीस हवालदार गिरीश पाटील, उमेश ठाकूर, प्रतिभा पाटील, भागवत शिंदे आणि होमगार्ड कर्मचाऱ्यांनी केली आहे. उर्वरित पेपरसाठीही परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.