चोपडा, प्रतिनिधी | तालुक्यातील विटनेर येथे रात्री ८.०० वाजेच्या सुमारास सलून दुकानात आलेल्या गिऱ्हाईकास घरी जाण्याची वेळ झाल्याने नकार दिल्याच्या कारणावरून त्याने दुकानदाराला केस कापायची कात्री मानेवर मारून प्राणघातक हल्ला केल्याची घटना काल (दि.२९) ला घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी की, मच्छिंद्र सैंदाणे हा आपल्या परिवारासह विटनेर येथे राहून सलूनचा व्यवसाय करतो. शुक्रवारी संध्याकाळी ७.५० वाजता रात्र झाली म्हणून तसेच घरी पाहुणे आले आहेत म्हणून हातातील गिऱ्हाईक आटोपून तो दुकान बंद करून घरी जाण्यास निघणार असतानाच प्रकाश कोळी दारू पिऊन दुकानात आला. त्याने माझी कटिंग व दाढी करून दे, असे सांगितले. त्यावेळी माझ्या घरी पाहुणे आले आहेत, आधीच आलेले दोन गिऱ्हाईक झाल्यावर मला घरी जायचे आहे, जेवण बाकी आहे, तुझी दाढी कटिंग सकाळी करतो, असे त्याने सांगितल्याचा राग येऊन आरोपी प्रकाश याने दुकानात पडलेली कात्री उचलून मच्छिंद्रच्या मानेवरच वार केला, त्यात तो जखमी झाला. तशा परिस्थितीत प्रकाशने त्याला दुकानाच्या बाहेर ओढून मारहाणही केली.
त्यावेळी दुकानात असलेल्या लोकांनी हे भांडण सोडवले व जखमी मच्छीन्द्र यास चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉ. शेखर पाटील यांनी त्याच्यावर उपचार केले. याबाबत आरोपी विरुद्ध भादवी कलम ३२३, ३२४, ५०४ व ५०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संदीप आराक यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. नामदेव महाजन करीत आहेत.