नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर कोपनहेगनमध्ये एका व्यक्तीने अचानक हल्ला केला. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीने मागून येऊन फ्रेडरिकसन यांना जोरात धक्काबुक्की केली. यामुळे त्या अडखळल्या. मात्र, कोपनहेगन पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. हा हल्ला युरोपियन युनियन निवडणुकीपूर्वी झाला आहे. इयूच्या निवडणुका 9 जून रोजी होणार आहेत. डॅनिश पंतप्रधान फ्रेडरिकसन सोशल डेमोक्रॅट्सच्या इयू आघाडीच्या उमेदवार क्रिस्टेल शाल्डेमॉस यांच्यासोबत प्रचार करत आहेत. घटनेच्या वेळी त्या प्रचार आटोपून परतत होत्या.
डेन्मार्कचे राज्य प्रसारक डीआरने पंतप्रधान कार्यालयाच्या हवाल्याने म्हटले आहे की, फ्रेडरिकसन यांना या हल्ल्याने धक्का बसला आहे. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पलीकडून एक व्यक्ती आला आणि त्याने पंतप्रधानांच्या सोबत्याला त्याच्या खांद्यावर जोरात धक्का दिला. धक्का खूप जोरदार होता, पण त्या पडण्यापासून वाचल्या. यानंतर त्या एका कॅफेमध्ये बसल्या.
46 वर्षीय फ्रेडरिकसन 2019 मध्ये डेन्मार्कच्या पंतप्रधान झाल्या. त्यांनी 2015 मध्ये त्यांच्या सोशल डेमोक्रॅट पक्षाची जबाबदारी स्वीकारली. यासह त्या डेन्मार्कच्या आतापर्यंतच्या सर्वात तरुण पंतप्रधान बनल्या आहेत. 2019 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेन्मार्कला त्यांच्या राज्य भेटीपूर्वी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, त्यांना उत्तर अमेरिकेतील ग्रीनलँडचा डेन्मार्कचा भाग विकत घ्यायचा आहे. फ्रेडरिकसन यांनी ट्रम्प यांचे विधान बेताल म्हटले. यामुळे ट्रम्प संतापले. डेन्मार्कचा दौरा रद्द करताना ते म्हणाले होते की, त्यांचे वक्तव्य माझ्यासाठी नसून अमेरिकेसाठी आहे. अमेरिकेशी असे कोणीही बोलू शकत नाही.