दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम आदमी पक्षाने सुरू केलेला नव्या चेहऱ्याचा शोध अखेर संपला आहे. दिल्ली सरकारमधील विद्यमान मंत्री आतिशी त्यांची जागा घेणार आहेत. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला.
आतिशीच्या नावाची घोषणा करताना दिल्लीचे परिवहन मंत्री गोपाल राय म्हणाले – आम्ही कठीण परिस्थितीत हा निर्णय घेतला आहे. केजरीवाल यांच्या प्रामाणिकपणावर चिखलफेक झाली. जनतेने त्यांना निवडून दिल्याशिवाय ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाहीत.
१ वाजता आतिशी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या- ‘मी माझे गुरू अरविंद केजरीवालजी यांचे आभार मानते, ज्यांनी मला इतकी मोठी जबाबदारी दिली. माझे अभिनंदन करू नका, मला पुष्पहार घालू नका, माझे आवडते मुख्यमंत्री राजीनामा देतील हा माझ्यासाठी आणि दिल्लीच्या जनतेसाठी दुःखाचा क्षण आहे.
दिल्ली सरकारच्या कथित मद्य घोटाळ्यात सीबीआय व ईडीनं अरविंद केजरीवाल यांना आरोपी ठरवून तुरुंगात टाकलं होतं. नुकतीच त्यांची जामिनावर सुटका झाली. सुटकेनंतर ते पुन्हा राज्याचा कारभार हाती घेतील अशी अपेक्षा होती. मात्र, केजरीवालांनी सत्तेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. दिल्लीची जनता जोपर्यंत पुन्हा निवडून देत नाही व आम्ही स्वच्छ असल्याचं ठरवत नाही तोपर्यंत मुख्यमंत्रीपदी बसणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्याचा शोध सुरू झाला होता.
केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत केंद्र सरकारच्या हल्ल्यांना त्यांनी समर्थपणे तोंड दिले होते. त्यामुळे केजरीवाल यांनी आतिशी यांच्यावर विश्वास टाकल्याचे बोलले जात आहे. अरविंद केजरीवाल हे आज दुपारी उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची भेट घेऊन पदाचा राजीनामा देणार आहेत. त्याआधी आम आदमी पक्षाच्या विधीमंडळाच्या नेत्या म्हणून आतिशी यांची निवड झाली आहे.