अखेर अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात सोडणार आवर्तन !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पांझरा काठच्या गावांना टंचाईच्या झळा बसत असताना मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या सूचनेनुसार धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात आवर्तन सोडण्याचे आदेश १ एप्रिल रोजी मिळाले आहे. त्यामुळे धुळे, शिंदखेडा व अमळनेर तालुक्यातील असंख्य गावांचा पाणीप्रश्न सुटून दिलासा मिळणार आहे.

मंत्री अनिल पाटील यांच्या सुचनेवर धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नागेश वट्टे यांना लेखी आदेश देऊन अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून धुळे, शिंदखेडा व अमळनेर तालुक्यातील गावांसाठी आरक्षित २५० दलघफु पाण्याचे एक आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत. मंत्री अनिल पाटील हे 31 मार्च रोजी धुळे दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या भेटीप्रसंगी वरील गावामध्ये टंचाईची परिस्थिती मांडत पिण्याच्या पाण्यासाठी तात्काळ कार्यवाही होणे आवश्यक असल्याच्या सूचना मांडल्याने जिल्हाधिकारी यांनी तत्परतेने कार्यवाही केली आहे. आवर्तन सुटल्यानंतर येत्या पाच ते सात दिवसात अमळनेर तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचणार आहे.

दरम्यान अमळनेर मतदारसंघातील पांझरा नदी काठच्या 16 ते 17 गावांच्या पाणीपुरवठा योजना या पांझरा नदी पात्रात आहेत. सध्या पांझरा नदी पात्रात पाणी नसल्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी ह्या कोरड्या पडत होत्या, तसेच आता उन्हाळा सुरू झाल्याने पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली होती, अश्या परिस्थितीत अक्कलपाडा धरणातून लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी पांझरा काठचे ग्रामस्थ करीत होते. अखेर टंचाई संदर्भात मदतीसाठी मदत व पुनर्वसन खात्यास विशेष अधिकार असल्याने व त्या खात्याचे मंत्री अनिल पाटील असल्याने या विभागामुळे टंचाईत मोठा दिलासा पांझरा काठच्या जनतेला मिळाला आहे.

Protected Content