कासमवाडी येथे भाजीपाला विक्रेत्याला तीन जणांकडून बेदम मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील कासमवाडीतील आठवडे बाजारात भाजीपाल्याचे दुकान लावण्याच्या कारणावरून भाजीपाला विक्रेत्याला तीन जणांकडून बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील कासमवाडी भागात दर शनिवारी आठवडे बाजार भरला जातो. आठवडे बाजार बाजारातील उर्दू शाळेसमोर प्रशांत सोमनाथ बडगुजर (वय-३६, रा. इंदिरानगर महादेव मंदिराजवळ शिरसोली) हा तरुण भाजीपाला विक्री करण्याचे दुकान लावतो. शनिवारी १२ मार्च रोजी देखील त्याने भाजीपाला विक्रीचे दुकान लावलेले होते. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास  दुकान लावण्याच्या कारणावरून आणि भाजीपालाचे उधारीचे पैसे मागण्याच्या कारणावरून भैय्या संतोष धोबी उर्फ टेलर, गणेश समाधान मराठे, रेखाबाई समाधान मराठे सर्व रा. स्मशानभूमीजवळ मेहरुण यांनी प्रशांत बडगुजर याला शिवीगाळ करून मारहाण केली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

यातील एकाने लोखंडी दांडा प्रशांतच्या डोक्यावर पाठीवर मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. दरम्यान याप्रकरणी सोमवारी १४ मार्च रोजी दुपारी प्रशांत बडगुजर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी भैय्या संतोष धोबी, गणेश समाधान मराठे, रेखाबाई समाधान मराठे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप पाटील करीत आहे.

 

Protected Content