चैतन्य तांडा येथे ग्रामस्थांनी धान्य वाटप करून दिला माणूसकीचा संदेश

चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या काळात  प्रत्यक्ष लाभार्थी व्यतिरिक्त केसरी कार्डधारकांना मोफत अन्न धान्याचा लाभ दिला जात नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.  हि गंभीर बाब लक्षात येताच तालुक्यातील चैतन्य तांड्याच्या सरपंच अनिता राठोड यांनी अनोखा उपक्रम राबवत गरजू कुटुंबाना प्रत्येकी  १० किलो धान्य वितरीत करून आदर्श निर्माण केला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत रेशन कार्डधारकांना प्रत्येकी २ किलो तांदूळ व ३ किलो गहू मोफत वितरीत करण्यात येत आहे. मात्र याउलट केसरी कार्डधारकांचा या योजनेत विचार करण्यात आलेला नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हि गंभीर स्वरूपाची बाब तालुक्यातील चैतन्य तांडा क्र. ४ च्या सरपंच अनिता राठोड यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अनोखा उपक्रम राबविला. या उपक्रमात लाभार्थींच्या कोट्यातून ज्यांच्याकडे  रेशन कार्ड नाही अशांना  दोन-तीन किलो धान्यांची मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास ग्रामस्थांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. ग्रामपंचायतीने २-३ किलो धान्याच्या मदतीचे आवाहन केलेले असताना ग्रामस्थांनी चक्क १० किलो प्रति कुटुंब वाटप करून नवीन अध्याय निर्माण केला आहे.  त्यामुळे सर्व स्तरातून याबाबत प्रशंसा केली जात आहे.  तांड्यात एकूण २५० कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यामधील ३० ते ४० कुटुंब हे केसरी कार्डधारक आहेत. कोरोनाच्या काळात उत्पन्नाचा स्रोत ठप्प झाल्यामुळे त्यांचे जगणे असह्य होऊन गेले आहेत. त्यात काही  कुटुंब हे केसरी कार्डधारक असल्याने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे. परंतु, चैतन्य तांडा ग्रामपंचायतीचे महिला सरपंच अनिता राठोड यांनी समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्यांनी वरील संकल्पना मांडली आणि गावातील नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यांच्या या वाखाणण्याजोगा कार्याबद्दल  तालुक्यातून कौतुक होत आहे. धान्य वाटपाप्रसंगी दक्षता समितीचे अध्यक्ष सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, ग्रामपंचायत सदस्य वसंत राठोड,  राजेंद्र चव्हाण, संदीप पवार, प्रविण चव्हाण, उदल पवार, गणपत जाधव,  रेशन दुकानदार पांडू चव्हाण,  कांतीलाल राठोड व करगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड आदी उपस्थित होते.

Protected Content