जळगाव (प्रतिनिधी) येथील मत्स्य विभागाच्या कनिष्ठ लिपीकासह सहाय्यक आयुक्ताला लाच घेतांना आज दुपारी अटक करण्यात आली आहे. सरकारी अनुदानाची फाईल पुढे सरकविण्यासाठी ठेकेदाराकडून १० हजाराची लाच मागणी करण्यात आली होती.
या संदर्भात अधिक असे की, शहरातील एका मत्स्य ठेकेदाराने शासकीय अनुदान मिळावे म्हणून मत्स्य विभागात प्रकरण टाकलेले होते. परंतू अनुदानाची ही फाईल पुढे सरकविण्यासाठी मत्स्य विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त रमेशकुमार जगन्नाथ धडीले (रा.नाशिक) यांनी १० हजाराची लाच मागितली होती. परंतू ठेकेदाराने लाच देण्यास नकार देत थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास धडील यांना १० हजार रुपयाची लाच देण्यासाठी मत्स्य व्यवसाय कार्यालयातील कनिष्ठ लिपीक रणजीत हरी नाईक (वय-49) रा.प्लॉट नं.29, रायसोनी नगर याने तक्रारदारकडून रक्कम स्वीकारतांना रंगेहात अटक करण्यात आले. सदरील कारवाई अँटी करप्शन विभागाचे पोलीस उपअधीक्षक जी. एम. ठाकूर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, मनोज जोशी, प्रशांत ठाकूर, प्रवीण पाटील, नाशिर देशमुख, ईश्वर धनगर, महेश सोमवंशी आणि सुनील पाटील यांनी केली.