खंडणीची मागणी करत दोन भावांवर प्राणघातक हल्ला !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील ओमकारेश्वर मंदिर परिसरात राहणाऱ्या दोन भावांना खंडणीची मागणी करत लोखंडी विळ्याने वार करून गंभीर जखमी करून गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन जबरी लांबवल्याची घटना शुक्रवार ३ मे रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे. या प्रकरणी रात्री १० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, रुपेश रवींद्र कानोजे (वय-३२) रा. ओंकारेश्वर मंदिर, भुसावळ हा तरुण त्यांचा भाऊ सुरज कानोजे यांच्यासोबत वास्तव्याला आहे. रेल्वे कॉन्ट्रॅक्टर म्हणून ते आपला व्यवसाय करत असतात. शुक्रवारी ३ मे रोजी सकाळी ९ वाजता त्याच परिसरात राहणार पवान कृष्णा मायकल आणि मीनाक्षी पवन मायकल हे दोघं रुपेश कानोजे यांच्या घरी आले. त्यांनी खंडणीची मागणी केली. याला विरोध केला असता पवन मायकल आणि मीनाक्षी मायकल या दोघांनी लोखंडी विळ्याने रुपेश व त्याचा भाऊ सुरज यांच्यावर वार करत जखमी केले. रुपेशच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची ७० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन जबरी हिसकावून लांबवल्याची घटना घडली. दरम्यान या प्रकरणी रात्री १० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारे पवन कृष्णा मायकल आणि मीनाक्षी पवन मायकल दोन्ही रा. ओमकारेश्वर मंदिर, जवळ भुसावळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे हे करीत आहे.

Protected Content