जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. जुन्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना कांचन नगर परिसरातील उज्ज्वल चौकात रविवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता घडली. या प्रकरणी रात्री ९.३० वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले नेमके?
जळगाव शहरातील चौगुले प्लॉट येथे राहणारा दुर्गेश चंद्रकांत सपकाळे (वय २२) हा तरुण आपल्या कुटुंबासह राहतो. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता तो कांचन नगर परिसरातील उज्ज्वल चौकात उभा असताना त्याला जुन्या वादातून धनंजय उर्फ आकाश बाविस्कर, सागर बाविस्कर, प्रतिक उर्फ प्रेम बाविस्कर, गायकवाड (पूर्ण नाव माहिती नाही) आणि त्यांच्या सोबत असलेले अनोळखी दोन जण यांनी अचानक घेरले.
अचानक हल्ला; शिवीगाळ आणि मारहाण
या टोळीने दुर्गेशला पाहताच त्याच्यावर जोरदार शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यातील एका आरोपीने लाकडी काठीने बेदम मारहाण केली, ज्यामुळे दुर्गेश जखमी झाला. तसेच, आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी देत दमदाटी केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकारानंतर जखमी दुर्गेश सपकाळे याने रात्री ९.३० वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्याच्या तक्रारीवरून धनंजय उर्फ आकाश बाविस्कर, सागर बाविस्कर, प्रतिक उर्फ प्रेम बाविस्कर, गायकवाड आणि दोन अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक किरण वानखेडे करत आहेत. शहरात दिवसाढवळ्या घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.