गेट बंद असतांना रेल्वेरूळ क्रॉस करण्याचा जीवघेणा प्रकार (व्हिडीओ)

asoda railway gate

जळगाव प्रतिनिधी । शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने शिवाजीनगर रहिवाशीं आसोदा रेल्वेगेटकडून जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र रेल्वेगेट बंदावस्थेत असतांना काही वाहनचालक दुचाकी ढकलून रूळ पार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रकार ‘लाईव्ह ट्रेन्डस् न्यूज’च्या नजरेस पडले आहे.

मंगळवारी आसोदा रेल्वेगेटवर भेट दिली असता एक वेगळा प्रकार नजरेस पडला. दोन मिनीटाच्या आत रेल्वे येवून धडकणार त्यापुर्वी रेल्वे गॅंगमन सुचनेनुसार गेट बंद केले. दोन्ही बाजूने वाहनांची गर्दी जमा होण्यास सुरूवात झाली. दरम्यान दोन्ही बाजूतून काही महाभाग वाहनधारक वेळ वाचविण्याच्या नादात जीव धोक्यात टाकून रेल्वेफाटकाच्या खालून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना गँगमनसह इतर वाहतूक शाखेचे पोलीस ओरडले, मात्र त्याकडे सर्वांनी दुलर्क्ष केले. तर दुसऱ्या बाजूच्या फाटकातून दुसरे महाभाग आणि वयाने प्रौढ असलेले व्यक्ती की त्यांना वाहन निट चालवताही येत नाही, त्यांनी एका बाजूने दुचाकी काढली आणि तश्यातच त्यांना मोबाईलवर कॉल आला. तश्याच परिस्थितीत बोलत दुचाकी ढकलत होते. या सर्व परिस्थितीतून एकच लक्षात आले की, परिस्थिती किती गंभीर आहे. अश्याने एखादा मोठा अपघात होऊ शकतो याचे देखील भान राहिले नाही. अश्या तज्ञ व सुज्ञ नागरीकांना सांगण्याची किंवा समजविण्याची गरज आहे का?, यात आचानकपणे होणाऱ्या अपघाताला रेल्वे प्रशासनाला दोष देणार का?

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवाजी नगर रेल्वे उड्डाण पुलाच्या कामास गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरूवात करण्यात आली आहे. मात्र शिवाजी नगर रहिवाश्यांना शहरात ये-जा करण्यासाठी मालधक्क्याजवळ आणि आसोदा फाटा रेल्वे गेटचा वापर केला जात आहे. या दोन्ही रेल्वे गेटमधून दररोज हजारो वाहने ये-जा करत असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणावर सकाळ आणि संध्याकाळी वर्दळ असते. आज मंगळवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर रहदारी असल्यामुळे सुमारे दोन तास वाहतूकीचा खोळंबा झाला होता. वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी रहदारी कमी करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत होते.

पहा : रेल्वेगेट बंद असतांना दुचाकी वाहनचालक कसे रेल्वेरूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात

 

Protected Content