Home Cities जळगाव जळगाव मनसे उपमहानगर अध्यक्षपदी आशुतोष जाधव यांची नियुक्ती

जळगाव मनसे उपमहानगर अध्यक्षपदी आशुतोष जाधव यांची नियुक्ती


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव शहर संघटनेत महत्त्वाची संघटनात्मक नियुक्ती करण्यात आली असून आशुतोष जाधव यांची जळगाव शहर उपमहानगर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनसेचे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांनी ही नियुक्ती जाहीर केली असून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी जाधव यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नियुक्तीपत्रानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय-धोरणे, कार्यक्रम आणि संघटनात्मक उपक्रम जळगाव शहरात प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी आशुतोष जाधव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पक्षाच्या विचारसरणीचा प्रसार करत संघटनात्मक कामात सातत्य राखणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय निर्माण करणे तसेच शहरात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सक्रियपणे काम करणे अपेक्षित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. संघटनेच्या कामात कोणतीही कुचराई किंवा तडजोड सहन केली जाणार नसल्याचेही नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

ही नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आली असून त्या कालावधीत केलेल्या कार्याचा आढावा घेऊन पुढील मुदतवाढीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. समाजात शिस्तबद्ध आणि जबाबदार पद्धतीने कार्य करत मराठी बांधव, भगिनी आणि मातांना अभिमान वाटेल असे कार्य करण्याची अपेक्षा पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

या नियुक्तीप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, विभाग अध्यक्ष राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आशुतोष जाधव यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या तसेच जळगाव शहरात मनसेची संघटना अधिक बळकट करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.


Protected Content

Play sound