


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मंजुषा हाउसिंग सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मौल्यवान वस्तू लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रमोद नामदेव आटाळे (वय ५४, रा. नंदनवन कॉलनी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद आटाळे यांच्या वहिनी वंदना यांचे मंजुषा हाउसिंग सोसायटी येथील घर २५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान बंद होते. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटातून १० हजार रुपये किमतीची सोन्याची नथ, चांदीच्या मूर्ती, चांदीची वीट आणि जुनी तांब्याची भांडी असा एकूण ३४ ते ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील हे करीत आहे.



