जळगाव प्रतिनिधी । उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्यावतीने जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांचा खान्देश उद्योग रत्न या पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम नुकताच कल्याण येथे पार पडला.
या सोहळ्यात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह राज्यमंत्री दादा भुसे, आमदार निरंजन डावखरे, आमदार गणपत गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील, पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. मानपत्र, स्मृतिचिन्ह असे स्वरूप असलेला पुरस्कार कल्याण आणि पंचक्रोशीतील हजारो खान्देशवासीयांच्या साक्षीने अशोक जैन यांनी स्वीकारला. ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, शेती आणि शेतकर्यांच्या जीवनात जैन उद्योग समूहाचे अनमोल कार्य आहे. त्यांनी उद्योग समूह वाढवताना भूमिपुत्रांना रोजगार देण्यास प्राधान्य दिले. देशातील शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यास डॉ. भवरलाल जैन यांचे कार्य नोंद घेण्यासारखे आहे.
अशोक जैन यांनी सत्कारप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सांगितले की शेती, शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून डॉ. भवरलालजी जैन यांनी कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे संस्कार आणि शिकवण घेऊन जैन इरिगेशन या कंपनीची वाटचाल सुरु आहे. कर्मभूमीशी नाळ घट्ट रहावी यासाठीच कंपनीने मुख्यालय जळगाव येथे ठेऊन जगभरात शाखा केल्या आहेत. शेतकर्यांच्या चेहर्यावर कायम हास्य रहावे, यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.