कोलकाता वृत्तसंस्था । भारताच्या राष्ट्रीय संघाकडून १३ एकदिवसीय आणि नऊ टी-२० सामने खेळणाऱ्या अशोक डिंडा याने प्रशिक्षकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी त्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. रणजी ट्रॉफीच्या या मोसमात पहिल्याच मॅचमध्ये बंगालने केरळचा एक दिवसआधीच पराभव केला. यानंतर आंध्र प्रदेशविरुद्धच्या मॅचची तयारी करण्यासाठी बंगालची टीम इडन गार्डनवर सराव करत होती. पण याचवेळी निवड समितीने अशोक डिंडाचं निलंबन करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम श्रेणी सामन्यात ४२० विकेट घेणाऱ्या अशोक डिंडाने मंगळवारी बंगाल रणजी संघाचे गोलंदाजीचे कोच रणदेब बोस (Ranadeb Bose) यांना शिवीगाळ केली. या घटनेनंतर बंगाल क्रिकेट असोसिएशनने तातडीची बैठक बोलवली आणि डिंडावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. डिंडाला रणजी स्पर्धेतील आंध्र प्रदेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी संघातून बाहेर काढण्यात आले आहे. डिंडाला संघातून बाहेर काढल्यानंतर बंगाल क्रिकेट असोशिएशनचे सचिवांनी बैठक बोलवली होती. या बैठकीस डिंडा आणि कोच बोस यांना देखील बोलवण्यात आले होते. बैठकीत डिंडाला बोस यांची माफी मागण्यास सांगण्यात आले. पण त्याने माफी मागण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. जर त्याने माफी मागितली असती तर संघातून बाहेर काढले नसते. कारण आंध्र प्रदेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यात एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते.