Home Cities जळगाव आशा स्वयंसेविकांचा प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा

आशा स्वयंसेविकांचा प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आशा स्वयंसेविका आपल्या हक्कांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्या असून, विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज जळगाव जिल्हा परिषदेला मोठा मोर्चा नेण्यात आला. महाराष्ट्र राज्य गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर ठिय्या आंदोलन व थाळीनाद करण्यात आला. आंदोलनाच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, थकित मानधन, आरोग्यवर्धिनीची रक्कम आणि कामावरून हटवलेल्या स्वयंसेविकांची पुन्हा नियुक्ती अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

जुलै 2025 पासून आशा स्वयंसेविकांचे मानधन रखडले असून, ते तातडीने अदा करावे, तसेच दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत मानधन देण्यात यावे, ही प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. आरोग्यवर्धिनी कार्यक्रमांतर्गत दिली जाणारी रक्कम कपात न करता पूर्ण मिळावी, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत देय रक्कम अदा व्हावी, दर महिन्याच्या कामाचा तपशील आणि वेतन चिठ्ठी मिळावी, अशा अनेक ठोस मागण्या उपस्थित करण्यात आल्या.

सामान्य किरकोळ आजारपणासाठी रजा आणि बाळंतपणाच्या सुट्टीचा लाभ देखील आशा स्वयंसेविकांना मिळावा, यासाठी आंदोलनात जोरदार मागणी करण्यात आली. यासोबतच कामावरून हटवण्यात आलेल्या समिना तडवी आणि अन्नू तडवी या आशा स्वयंसेविकांना तात्काळ पुन्हा कामावर घेण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

कामावर आधारित मोबदल्याची थकबाकी – जसे की आयुष्यमान भारत, हत्तीरोग, कुष्ठरोग, एनसीडी यांसारख्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत दिले जाणारे मानधनही न मिळाल्याचा आरोप उपस्थित स्वयंसेविकांनी केला. हे सर्व लाभ तत्काळ देण्याच्या मागणीसाठी जळगाव जिल्हा परिषदेवर हा मोर्चा आणण्यात आला होता.

या आंदोलनात महाराष्ट्र राज्य गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे सरचिटणीस भगवान दवणे, डॉ. रासकर, जिल्हाध्यक्ष संगीता भामरे, भारती मस्के, निरंजना तायडे, सुलोचना साबळे, मालुताई नरवाडे, मीनाक्षी सोनवणे, सुषमा चव्हाण, भानुदास पाटील यांच्यासह सुमारे 200 ते 300 आशा स्वयंसेविकांनी सहभाग घेतला. आंदोलनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांना विस्तृत मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.


Protected Content

Play sound